GRAMIN SEARCH BANNER

रायगड जिल्ह्यात आपत्तीचा कहर; शासनाकडून 70 लाखांची मदत मंजूर

Gramin Varta
117 Views

रायगड: यंदाच्या मोसमी पावसात रायगड जिल्ह्यात वादळी वाऱ्यांमुळे व अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागला. या आपत्तीत जिल्ह्यातील 368 घरांचे नुकसान झाले असून, तीन नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

मृतांच्या वारसांना प्रत्येकी चार लाखांची मदत देण्यात आली आहे. तसेच, राज्य शासनाकडून जिल्ह्यास 70 लाख रुपयांच्या नुकसानभरपाईसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. सदर निधीचे वितरण सुरू असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक यांनी दिली.

पावसाळ्याची सुरुवात यंदा मे महिन्यातच झाली. जून ते ऑगस्ट दरम्यान पावसाचा जोर अधिक होता. या काळात अनेक नद्यांना पूर आले, वादळी वाऱ्यांचा मोठा फटका बसला. अलिबाग, तळा व मुरुड तालुक्यात प्रत्येकी एक व्यक्तीचा मृत्यू झाला असून, पेणमध्ये एकजण जखमी झाला आहे. जखमी व्यक्तीलाही तातडीची मदत देण्यात आली आहे.

पशुधनाचे नुकसान: तळा, माणगाव, सुधागड, महाड, पोलादपूर, पनवेल आणि रोहा तालुक्यांमध्ये चार बैल, पाच गाई, तीन म्हशी व 12 शेळ्या मृत्युमुखी पडल्या असून, पाच जनावरे जखमी झाली आहेत. संबंधित पशुपालकांना शासकीय मदत वितरित करण्यात आली आहे.

सार्वजनिक मालमत्तेचेही नुकसान: तळा, महाड, पोलादपूर, रोहा, मुरुड, अलिबाग व म्हसळा तालुक्यांतील मंदिरे, शाळा, तलाव भिंती, विहिरी, स्मशानभूमी व इतर शासकीय मालमत्तांचे अंशतः अथवा पूर्ण नुकसान झाले आहे.

घरांचे नुकसान: कर्जत, खालापूर आणि पोलादपूर येथे चार पक्की घरे पूर्णतः पडली आहेत. याशिवाय 255 पक्की घरे अंशतः बाधित झाली आहेत. अलिबाग, पेण, पनवेल, उरण, खालापूर, महाड आणि पोलादपूर येथे 11 कच्ची घरे पूर्णतः पडली असून, आणखी 98 कच्च्या घरांचे अंशतः नुकसान झाले आहे.

आपत्तीग्रस्तांना तातडीने मदत देण्याचे कार्य प्रशासनाकडून सुरू असून, प्राप्त झालेला 70 लाख रुपयांचा निधी लवकरच पूर्णतः वितरित केला जाणार आहे.

Total Visitor Counter

3375815
Share This Article