रायगड : रायगड जिल्ह्यातून एक अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. खांदेरी किल्ल्याच्या सागरी परिसरात मासेमारीसाठी गेलेली एक बोट समुद्रात उलटल्याची माहिती मिळाली आहे. या अपघातात पाच जणांचे प्राण थोडक्यात वाचले असून, उर्वरित तिघेजण अद्यापही बेपत्ता आहेत. त्यांचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे.
उरण तालुक्यातील करंजा येथून मासेमारीसाठी सकाळी सातच्या सुमारास निघालेली ‘तुळजाई’ नावाची बोट समुद्रात ओहोटीच्या लाटांमध्ये सापडून सकाळी साडेआठच्या सुमारास खांदेरी किल्ल्याजवळ उलटली. ही बोट मनोहर गणपत कोळी यांच्या मालकीची होती.
या बोटीवर एकूण आठ जण होते. बोट बुडताच पाच जणांनी पोहत आपला जीव वाचवला. या अपघातात रोशन कोळी या तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून इतर चार जण किरकोळ जखमी आहेत. सध्या सर्व जखमींवर अलिबाग सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, बेपत्ता तिघांच्या शोधासाठी तटरक्षक दल, पोलीस, स्थानिक बचाव पथक आणि ड्रोनच्या मदतीने सागरी भागात शोधमोहीम सुरू आहे. मात्र, सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शोध मोहिमेला अडथळा येत आहे. समुद्राला आलेल्या उधाणामुळे परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे.
बचावलेले खलाशी आणि तांडेल:
- हेमंत बळीराम गावंड (वय 45, रा. आवरे, ता. उरण)
- संदीप तुकाराम कोळी (वय 38, रा. करंजा, ता. उरण)
- रोशन भगवान कोळी (वय 39, रा. करंजा, ता. उरण)
- शंकर हिरा भोईर (वय 64, रा. आपटा, ता. पनवेल)
- कृष्णा राम भोईर (वय 55, रा. आपटा, ता. पनवेल)
अद्याप बेपत्ता असलेले मासेमार:
- नरेश राम शेलार
- धीरज कोळी (रा. कासवला पाडा, उरण)
- मुकेश यशवंत पाटील
सध्या राज्यात विशेषतः कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर वाढलेला आहे. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. समुद्रातही प्रचंड वादळसदृश्य स्थिती निर्माण झाली असून, मासेमारी करणाऱ्यांसाठी ही परिस्थिती अतिशय धोकादायक ठरत आहे.
या दुर्घटनेने रायगड जिल्ह्यात खळबळ उडाली असून, कोळी बांधवांमध्ये चिंता आणि काळजीचं वातावरण निर्माण झालं आहे. प्रशासनाकडून बचावकार्य अधिक वेगाने राबवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.