कोकण धनगर समाजोन्नती मंडळाच्या शैक्षणिक मदत अभियानातून दुर्गम भागातील २५५ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य

Gramin Varta
78 Views

रत्नागिरी : शिक्षणाची ज्योत दुर्गम धनगरवाड्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने कोकण धनगर समाजोन्नती मंडळ, मुंबई (रजि. १९८०) यांच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या “शैक्षणिक मदत अभियान – २०२६” अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील दुर्गम धनगरवाड्यांमध्ये शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. अभियानाच्या पहिल्या टप्प्यात ११ व १२ जुलै रोजी एकूण २५५ विद्यार्थ्यांना वह्या, लेखनसाहित्य व अन्य शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

पहिल्या दिवशी न्यू इंग्लिश हायस्कूल, देवघर निवचीवाडी, सरस्वती रावजी जाधवशेठ हायस्कूल, किंजळे (खेड) तसेच अस्तान, बीजगर–तिसंगी, सणगर, आंबिवली आणि वडगाव येथील धनगरवाड्यांमध्ये १२१ विद्यार्थ्यांना साहित्याचे वितरण करण्यात आले. दुसऱ्या दिवशी आपेडे–चिंचवली, कुळवंडी शिंदेवाडी, धामनंद परिसर, काळकाई खिंड, खोपी परिसर आणि माणी शिंदेवाडी येथे १३४ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्यात आले.

यावेळी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याबरोबरच शिक्षणाचे महत्त्व, आत्मविश्वास, शिस्त, परिश्रम, स्पर्धात्मक वृत्ती आणि उज्ज्वल भविष्यासाठी आवश्यक प्रेरणादायी मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांनी या उपक्रमाचे उत्स्फूर्त स्वागत केले.

या अभियानासाठी मुंबईहून समाजसेवक श्री. शंकर कोळेकर, मंडळाचे अध्यक्ष प्रा. प्रदीप झोरे, कार्याध्यक्ष व रत्नागिरी जिल्हाध्यक्ष श्री. रामचंद्र आखाडे, सचिव श्री. प्रदीप खरात, संचालक श्री. विठ्ठल शिंदे, सभासद श्री. मनोहर ढेबे, समाजसेवक श्री. पप्यादादा आखाडे, समाजसेविका सौ. पूर्णिमा कोळेकर आणि सौ. वैशाली गोरे यांनी विशेष उपस्थित राहून विद्यार्थ्यांशी संवाद साधला व त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित केले.

या अभियानासाठी आर्थिक, सामाजिक तसेच श्रमदानाच्या माध्यमातून सहकार्य करणाऱ्या सर्व देणगीदार, संचालक मंडळ, समाजबांधव, हितचिंतक आणि स्थानिक कार्यकर्त्यांचे मंडळाच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.

शैक्षणिक साहित्य वाटपाचा दुसरा टप्पा १८ व १९ जुलै २०२६ रोजी आयोजित करण्यात येणार असून, दुर्गम धनगरवाड्यांतील प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत शिक्षणाची संधी आणि आत्मविश्वास पोहोचविण्याचा संकल्प भविष्यातही अधिक जोमाने सुरू राहणार असल्याचे मंडळाने सांगितले.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *