GRAMIN SEARCH BANNER

चिपळुणात अस्वलाचे दर्शन; वनविभाग सतर्क

Gramin Search
9 Views

चिपळूण: गेल्या काही वर्षांपासून बिबटे, कोल्हे यांसारखे वन्यप्राणी मानवी वस्तीत शिरल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. आता या मालिकेत अस्वलाचीही भर पडली असून, चिपळुणात रस्त्यावर भरदिवसा अस्वल दिसल्याने नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन्यजीव मानवी वस्तीकडे वळत असल्याने त्यांच्या सुरक्षिततेसोबतच स्थानिक रहिवाशांच्या जीवितालाही धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आज सकाळी चिपळुणातील कोळकेवाडी धरण प्रकल्पाच्या परिसरात एक अस्वल बिनधास्तपणे फिरताना काही स्थानिकांना दिसले. येथील एका सुरक्षारक्षकाने या अस्वलाचा आपल्या मोबाईलमध्ये व्हिडिओ चित्रित केला. हा व्हिडिओ तात्काळ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि बघता बघता सर्वत्र पसरला. या व्हिडिओमध्ये अस्वल रस्त्यालगतच्या परिसरातून जात असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

अस्वलासारखा हिंस्र प्राणी मानवी वस्तीजवळ दिसल्याने परिसरातील नागरिक धास्तावले आहेत.या घटनेमुळे वनविभागाचीही चिंता वाढली आहे. अस्वलाचा अधिवास सामान्यतः घनदाट जंगलात असतो. असे असताना ते मानवी वस्तीजवळ कसे आले, याचा तपास वनविभाग करत आहे. खाद्य आणि पाण्याच्या शोधात हे प्राणी वस्तीकडे येत असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र, यामुळे मानवी वस्ती आणि वन्यजीव यांच्यातील संघर्ष वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

वनविभागाने तात्काळ या अस्वलाचा माग काढून त्याला पुन्हा नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.

यापूर्वीही चिपळूण परिसरात बिबट्या, कोल्हे यांसारख्या प्राण्यांचा वावर अनेकदा दिसून आला आहे. मात्र, अस्वलासारखा मोठा प्राणी दिसण्याची ही घटना दुर्मीळ असल्याने नागरिकांमध्ये अधिकच दहशतीचे वातावरण आहे. वनविभागाने यावर तातडीने उपाययोजना न केल्यास भविष्यात अधिक गंभीर घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Total Visitor Counter

2648062
Share This Article