लांजा : मुंबई-गोवा महामार्गावरील अंजणारी घाटात शुक्रवारी चारचाकी ट्रेलरचा भीषण अपघात झाला. समोरून येणाऱ्या ट्रकला चुकवण्याच्या प्रयत्नात ट्रेलर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ट्रेलर थेट रस्त्याच्या दुभाजकावर जाऊन जोरदार आदळला. अपघाताची तीव्रता इतकी होती की ट्रेलरचा पुढील भाग चक्काचूर झाला आणि चालक केबिनमध्ये अडकून पडला.
अपघाताची माहिती मिळताच लांजा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक निळकंठ बगळे, पोलिस उपनिरीक्षक मेदाड, हातखंबा वाहतूक मदत केंद्राचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सत्यजित घुले, एएसआय तळेकर तसेच पोलिस कर्मचारी दोरखंडे आणि खेडेकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. वाहतूक सुरळीत ठेवत बचावकार्य सुरू करण्यात आले.
दरम्यान, चालकाला ट्रेलरच्या केबिनमधून सुरक्षित बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. एमआयडीसी रत्नागिरी विभागाचे उपअग्निशमन अधिकारी विवेक राणे, चालक हर्षल आखाडे, अग्निशमन विमोचक प्रवीण पवार, प्रमोद राठोड, पृथ्वीराज मोरे आणि देवराज बंडगर यांनी अथक प्रयत्न करून चालकाची सुखरूप सुटका केली.
या अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. अपघाताचे नेमके कारण आणि इतर बाबींचा अधिक तपास लांजा पोलिसांकडून सुरू आहे.
अंजणारी घाटात ट्रेलरचा भीषण अपघात; चालक केबिनमध्ये अडकला, बचावासाठी पोलिस-अग्निशमनची शर्थ
Leave a Comment
