GRAMIN SEARCH BANNER

रायगड : उसर येथील वयोवृद्ध महिलेच्या घरावर जेसीबी

रायगड: उसर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या उभारणीचे काम गेल्या काही महिन्यांपासून सुरु झाले आहे. या जागेच्या बाजूलाच लागून असलेल्या घरांसह गोठा व पोल्ट्री फार्म तोडण्याचे काम प्रशासनाकडून करण्यात आले.

मोठ्या कष्टाने उभारलेल्या घरावर जेसीबी फिरवून काही क्षणात ते मातीमोल केले गेले. पोलिसांच्या बलाचा वापर करीत ही कारवाई करण्यात आली.

उसर येथील जानकीबाई शिंदे या वयोवृद्ध महिलेचे घर गेल्या अनेक वर्षांपासून आहे. कष्टाने त्या महिलेने घर उभारले. परंतु, विकासाच्या नावाखाली प्रस्तावित वैद्यकीय महाविद्यालयाला अडथळा ठरणाऱ्या या घरावर जेसीबी फिरविण्यात आला. वयोवृध्द महिलेस भालचंद्र शिंदे यांनी चार सप्टेंबरपर्यंत मुदत मागून ही कारवाई पुढे ढकलण्याची मागणी केली. परंतु घर, गुरांचा गोठा, पोल्ट्री बेकायदेशीर ठरवत सायंकाळी सुरु केली. रेवदंडा पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत किरवले, मेडीकल कॉलेजचे प्रशासकीय कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलीस अधिकाऱ्यांना विनवणी करण्यात आली. मेडीकल कॉलेजच्या अधिष्ठता यांच्याशी संपर्क साधला. घटनास्थळी दाखल झालेले मेडीकल कॉलेजच्या कर्मचाऱ्यांना विनंती केली. तरीदेखील ना प्रशासन ना पोलीस अधिकारी ऐकण्याच्या मनस्थितीत होते. अखेर वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच अलिबाग तहसीलदार कार्यालयातील निवासी नायब तहसीलदार संदीप जाधव यांनी घटनास्थळी जाऊन घर, गोठे तोडण्याची कारवाई सुरु केली. आठ दिवसांची मुदत मागूनही प्रशासनाने त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले. प्रशासनाच्या या मनमानी कारभाराबाबत नाराजीचे सुर उमटत आहेत. याबाबत मेडीकल कॉलेजच्या अधिष्ठाता यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही.

उसर येथील घरांसह गोठा, पोल्ट्री बेकायदेशीर दाखवून कारवाई करण्यात आली. या कारवाईबाबत न्यायालयात दाद मागितली आहे. चार सप्टेंबरला न्यायालयात सुनावणी होणार होती. म्हणून प्रशासनासह पोलिसांना विनंती करीत कारवाई थांबविण्यात यावी अशी मागणी केली. परंतु, प्रशासन व पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केले. अखेर आम्ही कष्टाने उभारलेले घर, गोठे जमीन दोस्त झाले. गुरे कुठे ठेवायची असा प्रश्न निर्माण झाला असून, जानकीबाई शिंदे या वयोवृद्ध महिला बेघर झाली असून पावसाळ्यात जावे कुठे असा प्रश्न तिच्या समोर आहे. – भालचंद्र शिंदे,ग्रामस्थ

मेडीकल कॉलेजसाठी जागा हस्तांतरित करण्यात आली होती. त्या जागेतच गोठे व पोल्ट्रीसह राहते घर होते. राहत्या घरातील आजीचे अन्य ठिकाणीदेखील घर आहे. त्यांना अनेक वेळा नोटीस देण्यात आल्या आहेत. मेडीकल कॉलेजमार्फत ही कारवाई झाली आहे. महसूल विभागाचे निवासी नायब तहसीलदार यांना पाठविण्यात आले होते. परंतु, काय कारवाई केली याची पूर्ण माहिती नाही. ती माहिती मेडीकल कॉलेजच्या डीन आणि निवासी नायब तहसीलदार संदीप जाधव देतील.– मुकेश चव्हाण उपविभागीय अधिकारी, अलिबाग.

Total Visitor Counter

2475393
Share This Article