देवरुख (प्रतिनिधी) – देवरुख येथील कुंभ्याचा दंड परिसरात माळरानावर चरत असताना तुटून पडलेल्या वीज तारेचा शॉक लागून दोन गाभण म्हशींचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना आज शनिवारी दुपारी १२:३० वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत शेतकरी अमोल कोळी यांचे सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले असून, त्यांना महावितरणकडून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
देवरुख येथील अमोल कोळी यांच्या मालकीच्या दोन मुरा जातीच्या म्हशी होत्या. इतर जनावरांप्रमाणे त्या नेहमी मार्लेश्वर तिठ्याजवळील माळरानावर चरायला जात असत. आज दुपारीही त्या चरावयास गेल्या होत्या. त्याचवेळी, माळावर तुटून पडलेल्या वीज तारेच्या संपर्कात आल्याने दोन्ही म्हशींना विजेचा जोरदार धक्का बसला आणि त्यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेमुळे अमोल कोळी यांच्यावर मोठं संकट कोसळलं आहे. गाभण असलेल्या म्हशींच्या मृत्यूमुळे त्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. महावितरणच्या हलगर्जीपणामुळेच हा अपघात घडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे, महावितरणने तातडीने पंचनामा करून अमोल कोळी यांना योग्य ती नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.