रत्नागिरी: अमली पदार्थविरोधी मोहिमेला रत्नागिरी जिल्ह्यात यश आले असून, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ५३९ ग्रॅम गांजा बाळगणाऱ्या एका व्यक्तीला अटक केली आहे. जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत सुमारे १५ हजार रुपये असून, एकूण ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जिल्ह्यात अमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला (LCB) विशेष सूचना दिल्या होत्या. या सूचनांनुसार, LCB चे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक कार्यरत होते.
काल, २५ जून २०२५ रोजी LCB पथक रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मिशन कॅम्प ते गवळीवाडा रोडवर गस्त घालत असताना, त्यांना एक संशयित व्यक्ती मोटरसायकलवर संशयास्पद हालचाली करताना दिसला. पोलिसांनी संशयावरून त्याला थांबवून चौकशी केली. त्यावेळी त्याच्याजवळ अमली पदार्थ असण्याची शक्यता असल्याने, दोन पंचांच्या समक्ष त्याच्याकडील पिशवीची तपासणी करण्यात आली.
या तपासणीत पिशवीमध्ये हिरवट-काळपट रंगाचा आणि उग्र वासाचा गांजासदृश्य पदार्थ आढळून आला. त्याचे वजन केले असता, ५३९ ग्रॅम वजनाचा गांजा असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तात्काळ ४५ वर्षीय जहीर मेहमूद काजी, रा. गवळीवाडा, रत्नागिरी या आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडून १५ हजार रुपये किमतीचा गांजा आणि इतर मुद्देमाल असा एकूण ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आरोपी आणि जप्त केलेला मुद्देमाल पुढील कायदेशीर कारवाईसाठी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे.
ही यशस्वी कामगिरी सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, पोलीस उपनिरीक्षक ओगले, पोलीस हवालदार शांताराम झोरे, बाळू पालकर, अमित कदम, योगेश नार्वेकर, योगेश शेट्ये आणि महिला पोलीस हवालदार वैष्णवी यादव यांनी केली आहे.