रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात नेहमीच अग्रेसर राहिलेले मजगाव, आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. या गावातील मूळ रहिवासी आणि सध्या रायगड जिल्ह्यात कार्यरत असलेले शिक्षक शोएब मुख्तार इब्जी यांना त्यांच्या अतुलनीय योगदानासाठी प्रतिष्ठित ‘माधवबाग आदर्श शिक्षक पुरस्कार’ प्रदान करण्यात आला आहे. शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे मजगावच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
शोएब इब्जी यांनी डी.एड. पूर्ण केल्यावर तात्काळ रायगडमधील उरण येथील सिटीझन्स हायस्कूलमध्ये शिक्षकी पेशा सुरू केला. आपल्या अध्यापनाच्या प्रभावी शैलीमुळे त्यांनी अल्पावधीतच विद्यार्थ्यांचे आणि शिक्षणप्रेमींचे लक्ष वेधून घेतले. त्यांनी शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी अथक परिश्रम घेतले आणि संस्थेला यशाच्या शिखरावर नेले. त्यांच्या या भरीव योगदानालाच मिळालेली ही पोचपावती आहे.
हा पुरस्कार सोहळा कोकण मतदार शिक्षक संघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे आणि माधवबागचे प्रशासक डॉ. राहुल जाधव यांच्या हस्ते पार पडला. या वेळी निर्भय पाटील, डॉ. अनिरुद्ध पाटील, बबन पाटील, अविनाश कदम, भुसे सर, तसेच शोएब इब्जी यांचे सहकारी शिक्षक अशफाक मुकादम, अली सर, अकील मुल्लानी सर, मित्रपरिवार आणि नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी शोएब इब्जी यांना त्यांच्या या यशाबद्दल भरभरून शुभेच्छा दिल्या.
शोएब इब्जी केवळ एक उत्कृष्ट शिक्षकच नाहीत, तर ते एक प्रतिभावान कवी देखील आहेत. त्यांची कविता राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक कवी संमेलनांमध्ये गाजली आहे. शिक्षणासोबतच साहित्य क्षेत्रातही त्यांनी आपले नाव कमावले आहे. यापूर्वीही त्यांना त्यांच्या कार्यासाठी अनेक पुरस्कार मिळाले आहेत, ज्यात AMP राष्ट्रीय पुरस्कार, कोकण रत्न पुरस्कार आणि अल मुस्तफा कल्चर अँड लिटरेचर आंतरराष्ट्रीय पुरस्कार यांचा समावेश आहे. गेल्या दहा वर्षांपासून ते एस.एस.सी. बोर्ड परीक्षेमध्ये यशस्वीपणे सहाय्यक परीक्षक म्हणूनही आपली जबाबदारी पार पाडत आहेत.
शोएब इब्जी यांच्या यशाने रत्नागिरीच्या शैक्षणिक परंपरेचा गौरव वाढवला आहे आणि भविष्यात अनेक शिक्षकांना त्यांच्या कार्याची प्रेरणा मिळेल अशी आशा आहे. त्यांच्या या कामगिरीबद्दल मजगाव आणि संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्याचा अभिमान नक्कीच दुणावला आहे.