खेड: घरगुती वापरासाठी असलेल्या एलपीजी सिलिंडरचा व्यावसायिक कारणांसाठी अवैध वापर करणाऱ्या एका हॉटेल चालकावर खेड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. खेड बसस्थानकाजवळील एका हॉटेलमध्ये ही कारवाई करण्यात आली असून, पोलिसांनी सुमारे २१ हजार रुपये किमतीचे सात गॅस सिलिंडर जप्त केले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक २६ जुलै २०२५ रोजी सकाळी ११.५५ वाजता खेड येथील तहसीलदार कार्यालयातील अधिकारी अमोल देशमुख (वय ३८) यांनी पंचांसह खेड बसस्थानकाजवळील ‘हॉटेल आशापुरा’ येथे तपासणी केली. यावेळी, हॉटेलचा मालक आदाराम असलाजी रायका हा घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरचा व्यावसायिक कारणांसाठी वापर करत असल्याचे निदर्शनास आले.
ही बाब गंभीर असून, एलपीजी गॅस (पुरवठा व वितरण नियमन) नियंत्रण आदेश २००० मधील कलम ३ चे हे उल्लंघन आहे. हॉटेलमध्ये घरगुती गॅसचा वापर करणे हे केवळ नियमांचे उल्लंघन नाही, तर स्फोटक पदार्थ असल्याने ते सुरक्षिततेच्या दृष्टीनेही धोकादायक आहे.
अधिकाऱ्यांनी घटनास्थळावरून लाल रंगाचे एकूण सात सिलिंडर जप्त केले. यामध्ये पाच भरलेले आणि दोन रिकामे सिलिंडर होते. या जप्त केलेल्या सिलिंडरमध्ये एचपी गॅसचे तीन आणि भारत गॅसचे चार सिलिंडर होते, ज्यांची एकूण किंमत २१ हजार रुपये आहे. या सिलिंडरचे वजन आणि क्रमांक यांचीही नोंद करण्यात आली.
या सिलिंडरच्या सुरक्षिततेचा विचार करून ते संबंधित गॅस एजन्सीच्या ताब्यात सुपूर्द करण्यात आले. या घटनेची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी आणि तहसीलदारांना देण्यात आली. त्यांच्याकडून गुन्हा दाखल करण्याचे आदेश मिळाल्यानंतर, २१ ऑगस्ट २०२५ रोजी अमोल देशमुख यांनी खेड पोलिस ठाण्यात हॉटेल मालक आदाराम असलाजी रायका यांच्या विरोधात तक्रार दाखल केली.
त्यानुसार गुन्हा नोंदवला असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. अशा प्रकारे घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर करणे कायद्याने गुन्हा असून, यापुढेही अशा प्रकारच्या गैरव्यवहारांवर कठोर कारवाई केली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
खेडमधील हॉटेलमध्ये घरगुती गॅस सिलिंडरचा वापर उघड, 7 सिलिंडर जप्त, मालकावर गुन्हा
