GRAMIN SEARCH BANNER

आंबोळगड ग्रामस्थांकडून एपीआय प्रमोद वाघ यांचे स्वागत; पर्यटनवाढीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेबाबत चर्चा

राजन लाड (जैतापूर)
आंबोळगड ग्रामस्थांकडून नुकतेच सहाय्यक पोलीस निरीक्षक (एपीआय) प्रमोद वाघ यांचे जाहीर स्वागत करण्यात आले. आंबोळगड हे गाव पर्यटन दृष्टिकोनातून झपाट्याने विकसित होत असून, त्यासोबतच काही सामाजिक व कायदेशीर अडचणीही निर्माण होत असल्याने स्थानिक ग्रामस्थांनी या पार्श्वभूमीवर पोलिसांसमवेत महत्त्वपूर्ण चर्चा केली.

गावात रात्री अपरात्री बाहेरून येणाऱ्या, विशेषतः युवक-युवतींकडून गैरप्रकार होत असल्याच्या तक्रारी वाढत असल्याने त्यावर प्रतिबंध घालण्यासाठी पोलिसांनी स्थानिकांच्या सूचना ऐकून घेतल्या. सोशल मीडियावरून गावाचे वातावरण बिघडेल अशा पोस्ट टाकणाऱ्यांविरोधात त्वरित कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली.

तसेच, आंबोळगड समुद्रकिनाऱ्याची आकर्षक नैसर्गिक पार्श्वभूमी आणि सुधारलेला रस्ता यामुळे पर्यटकांची वर्दळ वाढली आहे. मात्र, काही अल्पवयीन मुले ट्रिपल सीटने मोटरसायकल चालवताना आढळून येत असल्याने, त्यावर कडक उपाययोजना करण्याची गरज व्यक्त झाली.

या अनुषंगाने, महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावता येतील का, याबाबतची शक्यता पोलिसांकडून तपासली जात आहे. ग्रामस्थांच्या सहकार्याने पर्यटन वाढीसोबत सुरक्षितता जपण्याचा निर्धार या चर्चेदरम्यान करण्यात आला.

या बैठकीत माजी सरपंच राजाराम पारकर, हॉटेल व्यावसायिक विश्वास करगुटकर, धनेश्वर खाडये , निवृत्त पोलीस सुहास पारकर, सुनील करगोटकर, मनोज पारकर, प्रसाद करगुटकर, देवेंद्र करगुटकर, पंढरीनाथ वाडेकर, शत्रुघ्न नार्वेकर, दत्ताराम वाडेकर, संदेश करगुटकर, देवनाथ पारकर आदींसह स्थानिक पदाधिकारी, ग्रामस्थ, पोलीस विभागाचे अधिकारी यांच्यासह काही सामाजिक कार्यकर्तेही उपस्थित होते. आगामी काळात आंबोळगडमध्ये पर्यटनाबरोबरच कायदा व सुव्यवस्थाही बळकट करण्यात येईल, असा विश्वास या वेळी व्यक्त करण्यात आला.

Total Visitor Counter

2455621
Share This Article