पाली : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पाली विभागात शांतता, सुव्यवस्था आणि वाहतूक सुरळीत रहावी, यासाठी पाली पोलीस दूरक्षेत्र येथे समन्वय बैठक घेण्यात आली.रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली. यावेळी पाली पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक मोहन कांबळे,महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल तृप्ती सावंतदेसाई,पोलीस हेडकॉन्स्टेबल उदय बांगर, पोलीस कॉन्स्टेबल सूर्याजी पाटील,दर्शना शिंदे उपस्थित होते.
या बैठकीला पाली सरपंच विठ्ठल सावंत, नाणीज सरपंच विनायक शिवगण, साठरेबांबर सरपंच तृप्ती पेडणेकर,विभागातील पोलीस पाटील तसेच पाली व्यापारी संघटना,किरकोळ विक्रेते व फेरीवाले,रिक्षा आणि टेम्पो चालक-मालक संघटना, खासगी बस मालक व ट्रॅव्हल्स महामार्ग ठेकेदार कंपनी ईगल इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड व रवी इन्फ्राचे प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी ‘रिक्षा व्यावसायिकांनी गणेशोत्सवात वाहतुकीस अडथळा होणार नाही, अशा चुकीच्या पद्धतीने बसस्थानक,बाजारपेठेत,सेवा रस्ते इतर ठिकाणी पार्किंग करू नये त्याचप्रमाणे भाविकांकडून जास्त भाडे घेऊ नये. तसेच खासगी बस तथा ट्रॅव्हल्स या ठरवून दिलेल्या जागेवरच पार्किंग कराव्यात,रस्त्यावर गर्दी होईल अशा ठिकाणी पार्किंग करू नये, अशा सूचना देण्यात आल्या. तसेच किरकोळ फेरीवाल्यांनी आपली दुकाने लावताना वाहतुकीस अडथळा होईल अशी रस्त्यालगत लावू नये, तसे केल्यास सक्त कारवाई करण्यात येईल.
तसेच ग्रामपंचायत प्रशासनाने गणेशोत्सव काळात आठवडाबाजार.च्या दिवशी व इतर दिवशी दुकाने लावण्यासाठी वाहतुकीला अडथळा होणार नाही,अशा जागा निश्चित करून तेथे नियोजन करावे. योग्य त्या ठिकाणी बाजारपेठेत नो पार्किंग व पार्किंगचे फलक लावावेत. महामार्ग ठेकेदार कंपनी ईगल इन्फ्राने बाजारपेठेतील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघात होण्याची शक्यता असल्याने रस्त्यावरील खड्डे बुजवावेत. तसेच महामार्गाचे काम सुरू असल्याने रस्त्याकडेला अस्ताव्यस्त पडलेले सामान हे तत्काळ काढून घेण्याची सूचना देण्यात आल्या आहेत.