बंगळुरूमध्ये होणारे सामने नवी मुंबईत खेळवले जाणार
मुंबई: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं (आयसीसी ) महिला क्रिकेट वर्ल्ड कप 2025 साठी सुधारित वेळापत्रक जाहीर केलं आहे.
यामध्ये बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमऐवजी नवी मुंबईचं डी. वाय. पाटील स्टेडियम या महत्त्वाच्या स्पर्धेचं यजमानपद स्वीकारणार आहे.
३० सप्टेंबर ते २ नोव्हेंबरदरम्यान होणाऱ्या या आठ संघांच्या स्पर्धेत डी. वाय. पाटील स्टेडियमवर तीन लीग सामने, एक उपांत्य सामना आणि शक्यतो अंतिम सामना होणार आहे. इतर चार ठिकाणे कायम ठेवण्यात आली असून त्यात गुवाहाटीतील एसीए स्टेडियम, इंदूरमधील होळकर स्टेडियम, विशाखापट्टणममधील एसीए-व्हीडीसीए स्टेडियम आणि कोलंबोतील आर. प्रेमदासा स्टेडियम (श्रीलंका) यांचा समावेश आहे.
आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांनी या बदलावर समाधान व्यक्त करताना म्हटलं, “नवी मुंबईनं अलीकडच्या काळात महिला क्रिकेटसाठी महत्त्वाचं केंद्रस्थान निर्माण केलं आहे. आंतरराष्ट्रीय सामने आणि महिला प्रीमियर लीगमध्ये चाहत्यांचा मिळालेला प्रतिसाद अभूतपूर्व आहे. याच ऊर्जेमुळे वर्ल्ड कपचे सामने अविस्मरणीय ठरतील यात शंका नाही.”
ते पुढं म्हणाले की, “महिला क्रिकेटच्या प्रवासात आपण एका निर्णायक टप्प्यावर उभे आहोत. हा वर्ल्ड कप केवळ भारतातच नव्हे तर जगभर महिला क्रिकेटचं भविष्य घडविणारा टप्पा ठरू शकतो.”
स्पर्धेतील महत्त्वाचे सामने
उद्घाटन सामना : ३० सप्टेंबर, गुवाहाटी – भारत विरुद्ध श्रीलंका
५ ऑक्टोबर, कोलंबो – भारत विरुद्ध पाकिस्तान
१२ ऑक्टोबर, विशाखापट्टणम – भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया
१९ ऑक्टोबर, इंदूर – भारत विरुद्ध इंग्लंड
२३ ऑक्टोबर, नवी मुंबई – भारत विरुद्ध न्यूझीलंड
२६ ऑक्टोबर, नवी मुंबई – भारत विरुद्ध बांगलादेश
उपांत्य आणि अंतिम सामने
उपांत्य सामना १ : २९ ऑक्टोबर, गुवाहाटी/कोलंबो
उपांत्य सामना २ : ३० ऑक्टोबर, नवी मुंबई
अंतिम सामना : २ नोव्हेंबर, नवी मुंबई/कोलंबो
यंदाचा महिला वर्ल्ड कप भारतात तब्बल १२ वर्षांनी होत असून, चाहत्यांना भव्य क्रिकेट सोहळ्याचा आनंद घेता येणार आहे.
महिला क्रिकेट वर्ल्ड कप 2025 साठी सुधारित वेळापत्रक जाहीर
