गुहागर : तालुक्यातील चिखली मांडवकरवाडी येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक २ समोर भरदुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास एका भल्यामोठ्या गव्याचे दर्शन घडल्याने खळबळ उडाली. विद्यार्थ्यांपासून शिक्षक आणि पालकांपर्यंत सर्वांनी मोठ्या उत्सुकतेने या गव्याचे दर्शन घेतले. काहींनी त्याचे फोटोही काढले, मात्र अनेकजण भयभीत झाले.
या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. जंगलातील गवे वस्तीमध्ये आल्याच्या या घटना वारंवार घडू लागल्याने नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. विशेषतः लहान मुले आणि शाळकरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. स्थानिक ग्रामस्थांच्या माहितीनुसार, या गव्याबरोबर आणखी चार ते पाच गवे या भागात संचार करत असल्याचे निदर्शनास आले आहे.
वाढत्या जंगलतोडीमुळे गवे, बिबटे, रानडुक्कर यासारखे वन्यप्राणी आता मानवी वस्त्यांमध्ये शिरकाव करत आहेत. यामुळे एखादा अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. स्थानिक ग्रामस्थांनी वनविभाग तसेच प्रशासनाने तातडीने लक्ष घालून या गव्यांच्या हालचालींवर नियंत्रण आणावे, अशी मागणी केली आहे.
वन्यप्राण्यांचे वस्तीमध्ये वाढते प्रमाण आणि त्याबाबतचे यंत्रणांचे दुर्लक्ष यामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढीस लागली आहे. शाळेच्या आवारात गवा दिसणे ही अतिशय गंभीर बाब मानली जात असून भविष्यात अनर्थ टाळण्यासाठी तातडीची कारवाई होणे गरजेचे आहे.
गुहागर : शाळेसमोर भरदुपारी गवा दिसल्याने खळबळ; ग्रामस्थांत भीतीचं वातावरण
