रत्नागिरी : वाटद-खंडाळा तिहेरी खून प्रकरणात आणखी एक धक्कादायक घडामोड समोर आली आहे. मुख्य आरोपी दुर्वास पाटीलच्या वडिलांना जयगड पोलिसांनी अटक केली आहे. दर्शन पाटील (रा. वाटद-खंडाळा, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव असून, सीताराम वीर खून प्रकरणी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.
राकेश जंगम हा दुर्वासच्या सायली बारमध्ये वेटर म्हणून काम करत होता. ६ जून २०२४ रोजी दुर्वास आणि त्याच्या साथीदारांनी त्याचा गळा आवळून खून केला आणि मृतदेह आंबाघाटात फेकून दिला. त्यानंतर २१ जून रोजी राकेशच्या आईने जयगड पोलिसांत बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती.
यानंतर, मिरजोळे येथील रहिवासी भक्ती मयेकर हिच्या खुनाचा तपास सुरू असताना दुर्वासने पोलिसांसमोर आणखी दोन खून केल्याची कबुली दिली. त्यात राकेश जंगम आणि कळझोंडी येथील सीताराम वीर यांचा समावेश होता. या प्रकरणी दुर्वास पाटील, विश्वास पवार आणि निलेश भिंगार्डे यांना अटक करण्यात आली होती. यापैकी दुर्वास पाटील व विश्वास पवार हे भक्ती मयेकरच्या खून प्रकरणी शहर पोलिसांच्या कोठडीत आहेत, तर निलेश भिंगार्डे न्यायालयीन कोठडीत आहे.
या सर्व घडामोडीत आता दुर्वास पाटीलचा वडील दर्शन पाटीलही अटकेत आल्याने प्रकरण अधिक गडद झाले आहे.
ब्रेकिंग : सीताराम वीर खून प्रकरणात दुर्वास पाटीलच्या वडिलांनाही अटक





