GRAMIN SEARCH BANNER

संगमेश्वर: सोनवी नदीत पोहण्यासाठी गेलेल्या कोल्हापुरातील पर्यटकाचा बुडून मृत्यू

संगमेश्वर: उन्हाळी सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी कोल्हापूरहून आलेल्या पर्यटकांवर काळाने घाला घातला असून, सोनवी नदीच्या पात्रात पोहण्यासाठी गेलेल्या एका ३७ वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अजित शंकर बोरगे (रा. राजारामपुरी, शाहूनगर, १३ वी गल्ली, कोल्हापूर) असे मृत पावलेल्या पर्यटकाचे नाव असून, या घटनेमुळे संगमेश्वर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेली माहिती अशी की, अजित बोरगे हे त्यांचे मावस भाऊ विनोद मोहन कलक्टकी आणि अन्य मित्रांसह कोल्हापूर येथून टाटा सुमो गाडीने (क्रमांक एम.एच. १०-२२७०) संगमेश्वर तालुक्यातील लोवले येथे आपल्या मित्राच्या आजोळी फिरण्यासाठी आले होते. ५ एप्रिल रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास हे सर्व मित्र लोवले येथील सोनवी नदीच्या पात्रात पोहण्यासाठी उतरले होते. यावेळी पोहत असताना अजित बोरगे यांचा पाण्याचा अंदाज चुकल्याने ते नदीच्या पात्रात खोलवर बुडाले.

सोबत असलेल्या मित्रांनी तात्काळ शोध घेऊन त्यांना पाण्याबाहेर काढले आणि उपचारासाठी संगमेश्वर येथील खासगी धन्वंतरी हॉस्पिटलमध्ये नेले. मात्र, तेथील डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला.

अजित बोरगे यांना तातडीने संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. या दुर्घटनेमुळे कोल्हापूरवरून आनंदाने सहलीसाठी आलेल्या मित्रपरिवारावर शोककळा पसरली आहे. संगमेश्वर पोलीस ठाण्यात याप्रकरणी नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस करत आहेत.

Total Visitor Counter

3485118
Share This Article