GRAMIN SEARCH BANNER

चिपळुणात अतिक्रमणांवर नगरपालिकेचा हातोडा

चिपळूण : नगर परिषद प्रशासनाने सोमवारी (दि. 28) सकाळी मध्यवर्ती बसस्थानक ते भोगाळे परिसरात अतिक्रमणांचा सफाया केला. दोन दिवसांपूर्वी बसस्थानकासमोर हातगाडी उभी करण्यावरून दोन व्यावसायिकांचा वाद झाला.

हा वाद विकोपाला जाऊन एकमेकांना भिडत रस्त्यावर लोळविण्यापर्यंत घटना घडली. याचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर पसरल्यानंतर चिपळूण नगर पालिकेनेे सोमवारी गंभीर दखल घेऊन बसस्थानकापासून भोगाळेपर्यंतची अतिक्रमणे उद्ध्वस्त केली.

दोन दिवसांपूर्वी बसस्थानकासमोर दोन व्यक्तींमध्ये हातगाडी लावण्यावरून जोरदार हाणामारी झाली. सकाळच्या वेळेत घडलेल्या या घटनेचे पडसाद व्हिडीओच्या माध्यमातून शहरातील नागरिकांतून उमटले. अतिक्रमणांना पाठीशी घालण्याचे काम नगर परिषद प्रशासन करीत आहे. काही दिवसांपूर्वी कारवाई केल्यानंतर पुन्हा अतिक्रमणे वाढली. मात्र, त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. परिणामी, अतिक्रमण करणार्‍यांमध्येच आता हाणामारी सुरू झाली आहे. हा चिपळूणच्या संस्कृतीला गालबोट लावण्याचा प्रकार आहे, अशा प्रतिक्रिया उमटल्यावर प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेत सोमवारी अतिक्रमण हटाव मोहीमअंतर्गत पथकाने बसस्थानकाच्या समोरील नव्याने उभी राहिलेली अतिक्रमणे जमीनदोस्त केली.

बसस्थानकापासून भोगाळे परिसरात अतिक्रमणे वाढत होती. फुटाफुटावर बांबू आणि प्लास्टिकच्या आच्छादनाच्या शेड उभ्या राहिल्या होत्या. चार महिन्यांपूर्वी झालेल्या कारवाईनंतर काही काळ हा परिसर पूर्णतः मोक़ळा झाला होता. तसेच न.प.चे फिरते पथकही कार्यरत होते. त्यामुळे अतिक्रमण करणार्‍यांना चांगली जरब बसली होती; मात्र काही काळानंतर फिरते पथकही थांबते व अतिक्रमणे पुन्हा वाढू लागली. याकडे न.प.चे दुर्लक्ष झाल्याचा गैरफायदा घेऊन अतिक्रमण करणारे रस्त्याशेजारीच व्यवसाय थाटू लागले. अखेर मारामारीच्या घटनेनंतर न.प. प्रशासनाने कारवाई केली. आता पुढील कारवाई बाजारपेठ परिसरात करणार असल्याचे सांगितले जाते.

Total Visitor Counter

2455607
Share This Article