देवरुख– सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांनी १५ जून, २०२५ रोजी आयोजित केलेल्या सहाय्यक प्राध्यापक पदासाठीच्या महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षेचा(सेट) निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे(स्वायत्त) महाविद्यालय, देवरुखच्या विद्यार्थिनी कु. ऐश्वर्या कृष्णा जाधव ह्या सहाय्यक प्राध्यापक पदासाठी आवश्यक असणारी सेट(राज्य पात्रता परीक्षा) उत्तम गुणांनी यशस्वी झाल्या आहेत.
ऐश्वर्या जाधव यांनी भौतिकशास्त्र (फिजिकल सायन्स) या विषयातून परीक्षा उत्तीर्ण केली आहे. ऐश्वर्या यांनी गुरुवर्य काकासाहेब सप्रे विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयामधून १२वी विज्ञान शाखेचे शिक्षण प्रथम श्रेणीतून पूर्ण केल्यावर, आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयातुन बी. एस्सी. पदवी सन २०२३ मध्ये ९.८७ सीजीपीए मध्ये, तर एम. एस्सी. पदव्युत्तर पदवी सन २०२५ मध्ये ९.९८ सीजीपीएमध्ये उत्तीर्ण केली आहे.
ऐश्वर्या जाधव यांचे वडील कृष्णा लक्ष्मण जाधव हे रत्नागिरी पोलीस मुख्यालयात पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहेत, तर आई पल्लवी जाधव या गृहिणी आहेत. ऐश्वर्याला प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर, प्रा. डॉ. मीरा काळे, प्रा. उदय भाट्ये, प्रा. प्रशांत जाधव, प्रा. अनिकेत ढावरे आणि प्रा. नीलम आखाडे यांचे मार्गदर्शन लाभले. ऐश्वर्यानी मिळवलेल्या यशाचे संस्थाध्यक्ष सदानंद भागवत, नेहा जोशी, कृष्णकुमार भोसले, शिरीष फाटक, प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर आणि उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील यांनी अभिनंदन करून पुढील कारकीर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.
‘आठल्ये-सप्रे-पित्रे’च्या ऐश्वर्या जाधव सेट परीक्षेत यशस्वी
