रत्नागिरी (प्रतिनिधी): खवळलेल्या समुद्रात अचानक इंजिन बंद पडून तांत्रिक बिघाड झाल्याने गेल्या तीन ते चार दिवसांपासून मृत्यूच्या दाढेत अडकलेली ‘धनलक्ष्मी’ ही मच्छीमार नौका अखेर सुखरूपपणे किनाऱ्यावर परतली आहे. संपर्क यंत्रणा तुटल्यामुळे अथांग लाटांवर हिंदोळे खात रत्नागिरी व पावस दरम्यानच्या सागरी पट्ट्यात भरकटलेल्या या नौकेवरील ८ खलाशांना स्थानिक मच्छीमार, सामाजिक कार्यकर्ते आणि सागरी पथकाच्या प्रयत्नांमुळे रविवारी मिरकरवाडा जेट्टीवर सुरक्षित आणण्यात यश आले.
मासेमारीसाठी गेलेल्या ‘धनलक्ष्मी’ नौकेचे इंजिन अचानक बंद पडल्याने आणि संपर्क तुटल्याने नौकेवरील खलाशांची परिस्थिती बिकट झाली होती. बोट मालक व खलाशांनी मत्स्य व्यवसाय विभागाशी तातडीने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, तसेच मच्छीमारांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर मदतीचा संदेश प्रसारित केला. हा संदेश मिळताच कोकण संघटकचे ताहीर मुल्ला यांनी त्वरित पुढाकार घेत नावीद कनवडकर, मतीन डोंगरकर, सुहेल साखरकर, अल्ताफ साखरकर आणि नुरुल शेठ यांच्या साथीने रात्रभर समुद्रात बचाव मोहीम राबवली. या शोधमोहिमेत मत्स्य व्यवसाय विभागाचे अधिकारी चिन्मय साहेब, होमगार्ड आणि कर्मचाऱ्यांनीही सहकार्य केले. अखेर रविवारी सकाळी खलाशांना नौकेचे इंजिन पूर्ववत सुरू करण्यात यश आले आणि स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने नौका सुखरूप मिरकरवाडा जेट्टीवर दाखल झाली. नौका किनाऱ्यावर पोहोचताच स्थानिक कार्यकर्त्यांनी मुंबईहून आलेल्या बोट मालकाची व खलाशांची भेट घेऊन त्यांची भोजन व पाण्याची व्यवस्था करत त्यांना धीर दिला. सलग तीन दिवस समुद्रात जीवन-मरणाचा थरार अनुभवणाऱ्या या खलाशांसाठी शासकीय यंत्रणांपेक्षाही स्थानिक मच्छीमार व कार्यकर्त्यांची समयसूचकता आणि धाडसच देवदूत ठरले, अशी प्रतिक्रिया सागर सम्राट मच्छीमार बचाव व संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष जनाबभाई कारभारी यांनी व्यक्त केली आहे.






