सचिन यादव / धामणी
इतिहास हा विषय अनेकांच्या आवडीचा असतो पण तो केवळ वाचनापुरता मर्यादित न ठेवता ऐतिहासिक किल्ल्यांवर गिर्यारोहण करत तब्बल ३०० किल्ले सर करण्याची किमया साधली आहे ती भडकंबा येथील निखिल जामसंडेकर यांनी.
निखिल जामसंडेकर हे मूळचे भडकंबा गावाचे. पदवी शिक्षण घेऊन ते २०१५ साली पोस्टात प्रथम नोकरीला लागले. सध्या ते रत्नागिरी येथे टपाल खात्यात सॉर्टिंग असिस्टंट ह्या पदावर नोकरी करतात.
लहानपणी दिवाळीत किल्ले तयार करताना इतिहास आणि दुर्ग ह्याविषयी ओढ निर्माण झाली. शिक्षण मुंबई येथे झाले असल्याने दिवाळीला सुट्टीत ते गावी येत तेव्हा दर वर्षी दिवाळीत घरी अंगणात किल्ला तयार करत असत. त्यातून किल्ल्यांविषयी ओढ वाढत गेली. पुढे नोकरी लागल्यावर दुर्ग भ्रमंतीचा छंद जडला. पुढे नोकरीला लागल्यावर आर्थिक स्थैर्य आल्यावर त्यांनी दुर्गभ्रमंतीचा छंद जोपासायला सुरुवात केली.
पनवेल जवळचा कलावंतिण दुर्ग हा पहिला किल्ला सर केला. त्यानंतर ह्या छंदाने व्यापक रूप घेतले. दशकभराच्या आपल्या भ्रमंतीत त्यांनी उणेपुरे ३०० किल्ले सर केले आहेत. ह्या किल्ल्यांमद्धे अनेक किल्ले हे चढण्यासाठी अती अवघड आहेत. कलावंतिण दुर्ग, साल्हेर किल्ला, कळसूबाई हे अत्यंत कठीण किल्ले त्यांनी सर केले आहेत.
संगमेश्वर तालुक्यातील प्रचीतगड हा किल्लाही त्यापैकीच एक. मृग गड आणि विजयापुरा हे अवघड चढाईसाठी प्रसिद्ध असलेले गडही जामसंडेकर यांनी सर केले आहेत.
ह्या भ्रमंतीत त्यांना अनेक अडचणींना आणि संकटांना तोंड द्यावे लागले आहे. काही वेळा किल्ल्यांवर वाटही हरवली. अनेक वेळा दुर्गम गडांवर जाताना वाटाही सापडत नाहीत. अशा वेळी गुगल मॅपचा वापर करून त्यांनी त्या शोधल्या आहेत. काही वेळा एखादा किल्ला चढताना अर्धवट सोडूनही यावे लागले. पण आलेल्या संकटांना सामोरे जात त्यांनी त्यातून मार्ग काढला.
ह्याविषयीची एक आठवण जामसंडेकर सांगतात. नाशिक जवळच्या कात्रा किल्यावर जातानाची ही आठवण आहे. जामसंडेकर काही सहकार्यांबरोबर हा किला चढत होते. त्यांचा एक मित्र गडाच्या पाठच्या बाजूने चढत गडावर गेला. जामसंडेकर आणि त्यांचे मित्र एका ठिकाणी आले असताना वाटेत एक गुहा होती. तिथे जामसंडेकर फोटो काढत असताना त्यांच्या समोर बिबट्याने उडी मारली. अवघ्या पंधरा फुटांवर त्यांना बिबट्याचे दर्शन झाले. त्यानंतर मात्र त्यांनी तिथूनच परतण्याचा निर्णय घेतला.
पार्ले टेकर्स आणि महाराजा प्रतिष्ठान, खेड ह्या दोन संघटांशी जामसंडेकर निगडीत आहेत. त्या संस्थांच्या माध्यमातून ते सामाजिक कामही करतात. दुर्ग स्वच्छता, शैक्षणिक मदत असे उपक्रम ते सातत्याने करत असतात.
स्थानिक नागरिकांमध्ये किल्ल्यांबद्दल, त्याच्या इतिहासाविषयी निरुत्साह दिसतो. अनेक ठिकाणी पर्यटक किल्ल्याच्या पावित्र्याविषयी अनभिज्ञ असतात. अनेक किल्ल्यांवर मुख्य दरवाजा, बुरूज अशा ठिकाणी दुकाने थाटलेली पाहून किल्ल्याचे सौंदर्य विद्रूप होत असल्याचे मत जामसंडेकर यांनी व्यक्त केले.
आज अनेक किल्ल्यांवर जाऊन तरुणाई केवळ रिल्स बनवतात. त्यातून त्यांना किल्ला किती जाणून घेतला जातो हयाविषयी ते चिंता व्यक्त करतात.
तब्बल ३०० गड किल्ल्यांवर गिर्यारोहण करणारा किमयागार निखिल जामसंडेकर
