.….म्हणून सीताराम वीर यांनाही दुर्वासने संपवले
रत्नागिरी – जयगडजवळ असलेल्या खंडाळा येथील सायली देशी बारमध्ये भयानक हत्याकांड झाल्याचे उघड झाले आहे. एका खुनाचा छडा लावताना 3 खुनाचा उलगडा झाला. मात्र यामध्ये 4 आरोपी गुंतलेले असल्याने हे हत्याकांड पोलिसांनाही चक्रावून सोडणारे आहे. सायली बार मधील कामगार सीताराम लक्ष्मण वीर (वय ५५) हे कळझोंडी येथील रहिवासी आहेत. ते सायली बार मध्ये दारू पिण्यासाठी आले होते. वीर हे दुर्वास पाटील यांच्या मैत्रिणीला म्हणजे भक्ती मयेकर हिला वारंवार फोन करून त्रास देत होते. याच रागातून आरोपी दुर्वास पाटील, विश्वास पवार आणि राकेश जंगम यांनी एकमेकांच्या संगनमताने सीताराम वीर यांना हाताने आणि काठीने बेदम मारहाण केली. मारहाणीनंतर सीताराम वीर यांना चक्कर आल्याचे कारण सांगून तिन्ही आरोपींनी त्यांना रिक्षाने त्यांच्या कळझोंडी येथील घरी पाठवले. मात्र, घरी पोहोचल्यानंतर काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला. या खून प्रकरणी दुर्वास दर्शन पाटील (२८), विश्वास विजय पवार (४१), आणि राकेश अशोक जंगम (२८) या तिघांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राकेश जंगम याचा सीताराम वीर यांना मारण्यात मोठा हात होता. हे प्रकरण बाहेर येऊ नये यासाठी इतर कामगारांनाही धमकी देण्यात आली. ही घटना २९ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ८ ते दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घडली.
वीर यांच्या मुलाने, अमित सीताराम वीर (वय ३२) यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार, जयगड पोलिसांनी कलम ३०२ (खून), २०१ (पुरावा नष्ट करणे), आणि ३४ (समान उद्देश) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
दुसरी किनार
सीताराम यांना संपल्यानंतर आपली माहिती राकेश जंगम सर्वांना सांगू शकतो. पोलिसात जाऊ शकतो या भीतीने दुर्वास पाटील याने त्याला संपवण्याचा कट रचला. यासाठी त्याने विश्वास पवार (41, काळझोंडी, रत्नागिरी) आणि नीलेश भिंगार्डे (35, सांगली) याची मदत घेतली. राकेश याला कोल्हापूरला जायचे आहे सांगून बाहेर काढले आणि आंबा घाटात गळा आवळून खून केला. त्यानंतर त्याला दरीत फेकून दिले. यानंतर भक्ती ही लग्नासाठी तगादा लावत असल्याने तिचाही खून केला. असे 3 खून त्याने केले. यामध्ये भक्तीच्या पोटातील निष्पाप बाळाचा जीव गेला.