GRAMIN SEARCH BANNER

दापोलीत पर्यटनासाठी कुटुंबासहीत आलेल्या तेरा वर्षीय मुलीचा आकस्मिक मृत्यू

Gramin Varta
498 Views

मुंबई–कल्याण मधील सकपाळ कुटुंबावर काळाचा घाला

रत्नागिरी : पर्यटनासाठी आलेल्या एका कुटुंबावर दापोलीत काळाने घाला घातला. मुंबई–कल्याण येथून सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी कोकणात आलेल्या सकपाळ कुटुंबातील तेरा वर्षीय आंचल मदन सकपाळ हिचा अचानक मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. आनंदासाठी सुरू झालेला प्रवास अवघ्या काही तासांत शोकांत बदलला.

२५ डिसेंबर रोजी हे कुटुंब दापोली तालुक्यातील आंजर्ले परिसरातील एका रिसॉर्टमध्ये मुक्कामी आले होते. काही दिवस समुद्रकिनारा आणि निसर्गाचा मनसोक्त आनंद घेतल्यानंतर शनिवारी (२७ डिसेंबर) सकाळी परतीचा प्रवास करण्याची तयारी सुरू होती. मात्र सकाळी मुलीला उठवण्यासाठी गेलेल्या पालकांना आंचल शुद्धीवर नसल्याचे आढळले. तिचे शरीर थंड पडले होते व दात घट्ट बसलेले दिसताच कुटुंबीय घाबरले.

तत्काळ स्थानिकांच्या मदतीने तिला आंजर्ले येथील जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून अधिक उपचारांसाठी दापोली उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र तपासणीनंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आंचलला मृत घोषित केले. या घटनेने सकपाळ कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला.

आंचल ही ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथील सेंट थॉमस विद्यालयात इयत्ता आठवीत शिक्षण घेत होती. शुक्रवारी रात्री जेवणानंतर ती आनंदात खेळली होती. कोणतीही तक्रार नसताना झोपलेल्या आंचलचा पुन्हा उठलीच नाही, ही बाब अधिक वेदनादायक ठरली आहे. एकुलती एक लाडकी सुकन्या अचानक हिरावून गेल्याने कुटुंबीय व नातेवाईक अक्षरशः कोलमडून पडले आहेत.

या घटनेची माहिती मिळताच दापोलीच्या नगराध्यक्ष कृपा घाग, नगरसेविका प्रिती शिर्के, नगरपंचायतचे अभियंता सुनील सावके, निवृत्त शिक्षक रमाकांत शिगवण यांच्यासह सामाजिक कार्यकर्त्यांनी रुग्णालयात धाव घेऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले. दापोलीचे पोलीस निरीक्षक महेश तोरस्कर व सहाय्यक निरीक्षक यादव यांनीही रुग्णालयात भेट देत घटनेची माहिती घेतली.

आंचलच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी प्राथमिक वैद्यकीय अहवालानुसार अन्नातून विषबाधा (फूड पॉयझनिंग) झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया सुरू असून या प्रकरणाची नोंद दापोली पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पुढील तपास दापोली पोलीस करीत आहेत.

Total Visitor Counter

3374629
Share This Article