GRAMIN SEARCH BANNER

श्रीवर्धन : लुबना काझी यांची अमेरिकेत न्यायाधीशपदी नियुक्ती; कोकणी कन्येचा विदेशात डंका

saurabhsalvi26@gmail.com
1.2k Views

श्रीवर्धन:कोकणच्या मातीतील कर्तृत्वाने आज सातासमुद्रापार मोठी भरारी घेतली असून रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथील कन्या लुबना काझी चौधरी यांनी अमेरिकेतील न्यू जर्सी राज्याच्या प्रशासकीय कायदा न्यायाधीश पदावर नियुक्ती मिळवून एक नवा इतिहास रचला आहे. कोकणच्या सुपीक मातीतून उगवलेले हे तेजस्वी व्यक्तिमत्त्व आज जागतिक पातळीवर झळकले असून या महत्त्वाच्या पदावर विराजमान होणाऱ्या त्या विभागातील पहिल्या महिला ठरल्या आहेत. ही नियुक्ती केवळ त्यांचे वैयक्तिक यश नसून संपूर्ण रायगड जिल्हा आणि कोकणासाठी अत्यंत अभिमानाची बाब ठरली आहे. एका सामान्य कुटुंबातून प्रवास सुरू करून आंतरराष्ट्रीय स्तरावर न्यायव्यवस्थेत मानाचे स्थान मिळवणे ही त्यांच्या जिद्दीची, मेहनतीची आणि चिकाटीची मोठी साक्ष आहे.

लुबना काझी चौधरी यांनी शिक्षण आणि करिअरच्या प्रत्येक टप्प्यावर आपली उत्कृष्टता सिद्ध केली असून कठोर परिश्रम, अभ्यासू वृत्ती आणि समाजाभिमुख दृष्टिकोनाच्या जोरावर त्यांनी अमेरिकेच्या न्यायव्यवस्थेत आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे भारतीय महिलांची आणि विशेषतः ग्रामीण भागातील मुलींची क्षमता पुन्हा एकदा जागतिक स्तरावर अधोरेखित झाली आहे. या ऐतिहासिक कामगिरीमुळे श्रीवर्धनचे नाव आंतरराष्ट्रीय पटलावर अभिमानाने झळकले असून ‘मोठे स्वप्न पाहा आणि ते पूर्ण करण्यासाठी झटत राहा’ असा प्रेरणादायी संदेशच त्यांनी नव्या पिढीला दिला आहे. त्यांच्या या यशाची दखल घेत स्थानिक नागरिक, सामाजिक संस्था तसेच राजकीय नेत्यांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सोशल मीडियावरही त्यांचे मोठे कौतुक होत असून अनेक तरुण-तरुणी त्यांना आपले प्रेरणास्थान मानत आहेत. सर्वस्तरातून लुबना काझी चौधरी यांचे कौतुक केले जात असून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Total Visitor Counter

3484526
Share This Article