GRAMIN SEARCH BANNER

गुहागर: झोंबडी येथे पिण्याच्या पाण्यात आढळला सडलेला कोल्हा; ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात

गुहागर : तालुक्यातील झोंबडी काजळीवाडी येथील ग्रामस्थांचे आरोग्य दूषित पाण्यामुळे धोक्यात आले आहे. येथील पिण्याच्या पाण्याच्या मुख्य विहिरीमध्ये गुरुवारी एका कोल्ह्याचा सडलेला मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. हा कोल्हा पाण्यात बराच काळ राहिल्याने तो पूर्णपणे सडलेला होता आणि त्याला जंतू पडले होते. त्यामुळे विहिरीचे पाणी पूर्णपणे दूषित झाले असून, वाडीमध्ये अत्यंत दुर्गंधी पसरली आहे.

हेच दूषित पाणी पिण्यासाठी वापरल्यामुळे परिसरातील अनेक नागरिकांना ताप, उलट्या, जुलाब आणि पोटदुखीचा त्रास सुरू झाला आहे. लोकांची प्रकृती चिंताजनक बनल्याने गंभीर आजारामुळे आरोग्यास धोका निर्माण होईल, अशी भीतीचे वातावरण तयार झाले होते. या घटनेची माहिती मिळताच झोंबडी ग्रामपंचायतीचे सरपंच अतुल लांजेकर, उपसरपंच प्रणाली पवार, सदस्या मयुरी लांजेकर, ग्रामसेवक गोरख सोनवणे, दिपक गायकवाड आणि आशासेविका साक्षी सरदेसाई यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन नागरिकांची काळजीपूर्वक विचारपूस केली व आवश्यक ती दक्षता घेतली.
सरपंच अतुल लांजेकर आणि सदस्यांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने तातडीने मृत कोल्ह्याला विहिरीतून बाहेर काढून विल्हेवाट लावली. यानंतर सुरक्षेच्या उपाययोजना सुरू करत ग्रामपंचायत मार्फत विहिरीतील दूषित पाणी उपसा करण्याचे आणि संपूर्ण स्वच्छतेचे काम शुक्रवारपासून युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.

या गंभीर प्रकाराची गांभीर्याने दखल घेत गटविकास अधिकारी शेखर भिलारे आणि कार्यकारी अभियंत्या दिप्ती धारप यांच्याशी संपर्क साधण्यात आला. त्यांनी त्वरित सहाय्यक अभियंता गिरीश पापरकर आणि पवार यांना घटनास्थळी भेट देण्याचे निर्देश दिले. प्रशासकीय स्तरावर तातडीने हालचाली सुरू होऊन सध्या विहिरीची पूर्णपणे स्वच्छता, क्लोरिनेशन/निर्जंतुकीकरण आणि पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्याचे काम सुरू आहे. नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुप्रीम कांबळे, आरोग्य केंद्र तकवलीचे अधिकारी वैभव जाधव आणि मदन जानवळकर यांच्याशी भेट घेऊन वाडीतील नागरिकांसाठी शनिवार, दिनांक २९ नोव्हेंबर रोजी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

सरपंच अतुल लांजेकर हे स्वतः या संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत आणि नागरिकांची विचारपूस करत त्यांची काळजी घेत आहेत. दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर झालेल्या परिणामामुळे प्रशासन आणि ग्रामपंचायत तातडीने उपाययोजना करत असून, परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Total Visitor Counter

3485144
Share This Article