विरार: विरार पश्चिम मारंबळ पाडा जेट्टीवर शनिवारी दुपारी २ वाजता एक कार अपघातग्रस्त झाली. कार जेट्टीवर नेली जात असताना चालकाचा अंदाज चुकल्याने वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार थेट पाण्यात कोसळली.
या अपघातामुळे परिसरात काही वेळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली. स्थानिक नागरिकांनी तत्काळ धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. अपघातातील प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, अशी माहिती स्थानिकांकडून देण्यात आली आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलिस व स्थानिक प्रशासनाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. काही तासांच्या अथक परिश्रमानंतर कार बाहेर काढण्याचत यश आले असून नेमके अपघाताचे कारण शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, जेट्टीवर वाहन चालवताना दक्षता घेणे आवश्यक असून या ठिकाणी वारंवार अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाने सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही पुढे येत आहे.
विरार जेट्टीवर कारचा अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली
