चिपळूण: जिल्ह्याला लवकरच ३५ नव्या आशा सेविका मिळणार असून, संबंधित तालुक्यांमध्ये त्यांची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी ग्रामपंचायतींचे अधिकार काढून ते आरोग्य विभागाला देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, आशा सेविकांच्या मानधनात वाढ झाल्यामुळे या पदासाठी अर्ज करणाऱ्या इच्छुकांचा ओढा वाढला आहे.
आरोग्य विभागाच्या कामकाजात आशा सेविकांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असते. त्यामुळे गावागावात त्यांची उपस्थिती गरजेची ठरते. सध्या जिल्ह्यात हजारो आशा सेविका कार्यरत आहेत. काही वर्षांपूर्वी त्यांना अत्यंत कमी मानधनावर काम करावे लागत होते. मात्र, आता त्यांच्या मानधनात बऱ्यापैकी वाढ झाली असून, नियमित काम करणाऱ्या आशांना किमान १० हजार रुपये इतके मानधन मिळते. यापेक्षा जास्त मानधन घेणाऱ्या आशा सेविकाही जिल्ह्यात आहेत.
काही गावांचा वाढता विस्तार लक्षात घेता, तेथे कार्यरत असलेल्या आशा सेविकांवर कामाचा ताण येत होता. त्यामुळे त्या गावांमध्ये आणखी आशा सेविकांची नेमणूक करावी, अशी मागणी सातत्याने होत होती.
या मागणीनुसार, शासनाच्या आरोग्य सेवा अभियान संचालनालयातर्फे ही भरती जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्ह्यात एकूण ३५ आशा सेविकांची नियुक्ती केली जाणार आहे. यामध्ये मंडणगडमधील भिंगळोली, दापोलीतील पाजपंढरी, वाघवे, बांधतिवरे, खेडमधील असगणी, धामणदेवी, चिपळूणमधील मिरजोळी, वीर, देवपाट, वहाळ, संगमेश्वरमध्ये ५, रत्नागिरीत १८, लांजात १, तर राजापूरमध्ये १२ आशा सेविकांच्या जागा भरल्या जाणार आहेत.
पूर्वी या पदावर काम करण्यासाठी फारसे कोणी उत्सुक नव्हते. मात्र, आता वाढलेले मानधन, दिले जाणारे अधिकार आणि भविष्यात शासकीय कर्मचारी म्हणून दर्जा मिळण्याची आशा यामुळे उमेदवारांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. विशेष म्हणजे, काही ठिकाणी नववी उत्तीर्ण ही किमान शैक्षणिक अट असतानाही, पदवीधर महिलांनी या पदांसाठी अर्ज भरण्यात आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे. या भरतीमुळे जिल्ह्यातील आरोग्य सेवा अधिक बळकट होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.