लांजा : मुंबई-गोवा महामार्गावर लांजा येथे शनिवारी रात्री ८.३० च्या सुमारास दोन दुचाकींमध्ये झालेल्या भीषण अपघातात रत्नागिरी तोणदेतील एक तरुण जागीच ठार झाला. शैलेश शिवराम जाधव (वय ४५, रा. तोणदे, बौद्धवाडी, ता. जि. रत्नागिरी) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
जाधव हे त्यांच्या पॅशन प्रो मोटारसायकल (MH-08-AT-8671) वरून तोणदेहून लांजाकडे शनिवारी रात्री जात होते. लांजा कुंभारवाडी आयटीआयजवळ रात्री 8 वाजता ते आल्यानंतर समोरून भरधाव येणाऱ्या ऍक्टिव्हा दुचाकीने (MH-08-AW-0091) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही दुचाकी आशिष संदीप घडशी (वय २२, रा. कुर्णे, ता. लांजा) हे चालवत होते. धडकेनंतर शैलेश जाधव महामार्गावर दूर फेकले गेले आणि गंभीर दुखापतीमुळे जागीच त्यांचा मृत्यू झाला. तर ऍक्टिव्हा चालक आशिष घडशी हे जखमी झाले आहेत.
अपघाताची माहिती मिळताच लांजा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल आर. ए. कांबळे करत आहेत.
लांजात दोन दुचाकींची समोरासमोर धडक ; तोणदेतील तरुणाचा जागीच मृत्यू
