चिपळूण : तालुक्यातील गाणे (राजवाडा) येथे २३ जुलै रोजी झालेल्या भीषण अपघातात कळकवणे गावातील कबड्डीपटू यश सूर्यकांत घडशी (वय २०) याचे उपचारादरम्यान निधन झाले. यशच्या अकाली मृत्यूने कळकवणे, दसपटी आणि परिसरात शोककळा पसरली आहे.
या अपघातात ओवळी येथील संदीप शांताराम जाधव (वय २५) हे देखील गंभीर जखमी झाले. दोघे दुचाकीस्वार समोरासमोर धडकले होते. अपघातानंतर जखमींना तातडीने डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. यशची प्रकृती गंभीर असल्याने त्याला कराड येथील कृष्णा चॅरिटेबल रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्याचे निधन झाले.
यशच्या उपचारासाठी गावकऱ्यांसह अॅड. अमित कदम यांनी विशेष प्रयत्न केले, मात्र सर्वच प्रयत्न निष्फळ ठरले. यशच्या निधनाने गावात हळहळ व्यक्त होत असून त्याच्या जाण्याने खेळाडू आणि तरुणवर्ग हळहळला आहे.
यश हा कबड्डी क्षेत्रात उदयोन्मुख खेळाडू होता. खेळासोबतच त्याचा शांत व मनमिळावू स्वभाव सर्वांच्या लक्षात राहणारा होता. त्याच्या अंत्यविधीला काल कळकवणे येथे मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. खडपोली औद्योगिक वसाहतीतील कर्मचारी, विविध क्षेत्रातील मान्यवर आणि स्थानिक नागरिकांनी यशला अश्रुपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
चिपळूण : अपघातात जखमी झालेल्या कबड्डीपटू यश घडशीची मृत्यूशी झुंज संपली, गावावर शोककळा
