GRAMIN SEARCH BANNER

आदर्श शैक्षणिक कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यास पाच कोटींचा पुरस्कार देणार- मंत्री दादा भुसे

Gramin Varta
14 Views

मुंबई: क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गौरव पुरस्काराचे वितरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज करण्यात आले. मुंबईच्या एनसीपीए टाटा थिएटरमध्ये झालेल्या या समारंभात राज्यातील १११ गुणवंत शिक्षकांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

यावेळी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी पुढील वर्षापासून आदर्श शैक्षणिक कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यास पाच कोटींचा पुरस्कार दिला जाणार असल्याची घोषणा केली.

“पुढील वर्षापासून कला आणि क्रीडा क्षेत्रात कार्य करणाऱ्या शिक्षकांनाही सन्मानित केले जाणार आहे. तसेच जिल्हा स्तरावर आदर्श शैक्षणिक कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यांना अनुक्रमे पाच कोटी, तीन कोटी आणि दोन कोटी रुपयांची पारितोषिके दिली जातील. शब्द विचार घडवतो, विचार माणूस घडवतो आणि माणूस देश घडवतो. या प्रवासाची सुरुवात शिक्षकांकडून होते आणि म्हणूनच शिक्षक हे समाज व राष्ट्राचे खरे शिल्पकार आहेत,” अशा शब्दात मंत्री दादा भुसे यांनी पुरस्कार प्राप्त शिक्षकांच्या कार्याचे कौतुक केले.

ते पुढे म्हणाले, “महाराष्ट्र ही संत, समाजसुधारक आणि शिक्षणतज्‍ज्ञांची भूमी असून त्यांच्या कार्यातून समाजात परिवर्तन घडले. आजचे शिक्षक या परंपरेचे वारस आहेत. महाराष्ट्रातील अनेक शिक्षकांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर लौकिक मिळवला आहे. वारे गुरुजी, केशव गावित सर, दिलीप नाकाडे यांसारख्या शिक्षकांनी शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून दाखवली आहे. त्यामुळे शिक्षकांचा प्रवास हा विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठीच नाही तर समाजाच्या जडणघडणीसाठी महत्त्वाचा आहे.”

“राज्यात गुणवत्तापूर्ण व आनंददायी शिक्षण दिले जाते. आदर्श शिक्षकांची बँक स्थापन करून त्यांच्या उत्तम कामांचा अनुभव विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यावर तसेच निपुण महाराष्ट्र अभियानाद्वारे वाचन, लेखन व अंकज्ञान कौशल्य वाढवण्यावर भर दिला जाणार आहे,” असे दादा भुसेंनी स्पष्ट केले.

Total Visitor Counter

2648138
Share This Article