चिपळूण: मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे येथील पोस्ट ऑफिससमोर मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास एका भरधाव कंटेनरने उभ्या असलेल्या रिक्षाला पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते सूरज हंबीर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले.
एम. एच. 46 बी. यू. 7833 क्रमांकाचा कंटेनर मुंबई-गोवा महामार्गावरून जात असताना, त्याने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एम. एच. 08 बी. सी. 2514 क्रमांकाच्या रिक्षाला धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की रिक्षाचे मोठे नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते मदतीसाठी पुढे सरसावले.
अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती, मात्र तात्काळ मदतकार्यामुळे वाहतूक पूर्ववत करण्यात यश आले. या घटनेमुळे महामार्गावरील वाहतुकीच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे.