चिपळूणमधून ‘वणवा मुक्त महाराष्ट्र’ अभियानाचा शुभारंभ
चिपळूण: महाराष्ट्राला वणवामुक्त करण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातून, विशेषतः चिपळूणमधून, एका महत्त्वाकांक्षी अभियानाचा आज शुभारंभ झाला. राज्याचे उद्योग आणि मराठी भाषा मंत्री तसेच रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार उदय सामंत यांच्या हस्ते या अभियानाला सुरुवात झाली. जाणूनबुजून वणवे लावणाऱ्यांवर कठोर कारवाई करत गुन्हे दाखल करण्याचे स्पष्ट निर्देश यावेळी पालकमंत्र्यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.
वनविभाग, सामाजिक वनीकरण विभाग रत्नागिरी आणि ग्लोबल चिपळूण टुरिझम यांच्या संयुक्त विद्यमाने चिपळूण येथील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात वणवा प्रतिबंधक कार्यशाळा आणि खैर रोपे वाटप उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वणव्यांमुळे होणारे नुकसान आणि त्यामुळे प्रशासनावर येणारा ताण लक्षात घेता, वणवे लागूच नयेत यासाठी जनजागृती आणि उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक असल्याचे नामदार सामंत यांनी अधोरेखित केले. शासनाची कोणतीही स्वतंत्र वणवामुक्ती योजना नसली तरी, जनजागृतीच्या माध्यमातून हे अभियान सुरू करत असल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी त्यांनी नंदुरबार येथील वन अधिकारी साळुंखे यांच्या कार्याचे कौतुक केले, ज्यांच्या प्रयत्नांमुळे तेथे ७० टक्के वणवे कमी झाले आहेत.
पालकमंत्री सामंत यांनी वणव्यांच्या प्रमुख कारणांवर प्रकाश टाकला. विजेच्या तारांमधून होणारे स्पार्किंग, प्रवासात निष्काळजीपणे टाकलेली सिगारेट किंवा काडी, तसेच आपापसातील वाद ही वणव्यांची मुख्य कारणे असल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीपप्रज्वलन आणि वृक्षारोपणाने उद्घाटन झाले, ज्यात ‘वणवा मुक्त महाराष्ट्र’ या व्यापक उद्दिष्टासाठी शेतकऱ्यांच्या सक्रिय सहभागाची गरज व्यक्त करण्यात आली.
विभागीय वन अधिकारी गिरिजा देसाई यांनी प्रास्ताविकात सांगितले की, यंदा शासनाच्या निधीतून खैर लागवडीसाठी साडेचार लाख रोपे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. वन विभागाकडे केवळ एक टक्का क्षेत्र असून उर्वरित जमीन खाजगी असल्याने वणवा प्रतिबंधाची जबाबदारी शेतकऱ्यांनीही स्वीकारणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
आमदार शेखर निकम यांनी कोकणात वणव्यांमुळे कायम भीतीचे वातावरण असते असे सांगत, विजेच्या तारांमधून होणारे स्पार्किंग रोखण्यासाठी महावितरणने तातडीने लक्ष देण्याची मागणी केली. तसेच, वणव्यामुळे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण मिळावे, अशी सूचनाही त्यांनी पालकमंत्री सामंत यांच्याकडे केली.
जलदूत शहानवाज शहा यांनी वाढलेले गवत हे वणव्याचे प्रमुख कारण असल्याचे निदर्शनास आणून दिले आणि त्याची योग्य साफसफाई करून वणवे टाळण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमाला माजी आमदार रमेश कदम, माजी आमदार सदानंद चव्हाण, माजी सभापती बाळशेठ जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्य विनोद झगडे, ग्लोबल चिपळूण टुरिझमचे रामशेठ रेडीज, शहानवाज शहा, भाऊ काटदरे, विश्वास पाटील, समीर कोवळे, माजी उपनगराध्यक्ष बापू काणे, तहसीलदार प्रवीण लोकरे, मुख्याधिकारी विशाल भोसले, डीवायएसपी राजेंद्रकुमार राजमाने, राष्ट्रवादीचे नेते जयद्रथ खताते, तसेच वन अधिकारी प्रियंका लगड, अंकिता तरडे, राजेंद्र पाटील, प्रकाश सुतार, रणजीत गायकवाड, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष बाबाजीराव जाधव, जिल्हा कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले, निहार कोवळे, करामत मिठागरी, महंमद फकीर, स्वाती दांडेकर, कपिल शिर्के आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाहीर शाहीद खेरटकर यांनी केले तर आभार वनाधिकारी प्रियंका लगडे यांनी मानले.