चिपळुणातील कामगारांनी पालकमंत्र्यांच्या बैठकीत मांडली व्यथा
चिपळूण : पोफळी येथील महानिर्मिती विभागात १८० कामगार ठेकेदार पद्धतीवर कार्यरत आहेत. या कामगारांना महानिर्मितीकडून सुमारे २५ हजारांचे वेतन दिले जाते. मात्र, प्रत्यक्षात कामगारांना ९ ते १० हजार वेतनच मिळते. ही बाब कामगारांनी चिपळुणात शनिवारी झालेल्या आढावा बैठकीत पालकमंत्री उदय सामंत यांच्या निदर्शनास आणून दिली. याबाबत पालकमंत्री सामंत यांनी संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरत या ८ ठेकेदारांना नोटिसा बजावून लवकरच बैठक घेण्याबाबत सूचना दिल्या.
मंत्री सामंत यांनी बहादूरशेखनाका येथील सहकार भवनच्या सभागृहात सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेतली. या बैठकीत महानिर्मिती, खडपोली व खेर्डी एमआयडीसी, प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत संयुक्त आढावा घेण्यात आला. यावेळी अधिकाऱ्यांकडून
समर्थक उत्तरे न मिळाल्याने मंत्री सामंत यांनी अधिकाऱ्यांची शाळाच घेतली. पोफळी महानिर्मिती विभागातील ठेकेदारी पद्धतीच्या कामगारांना महिना ९ ते १० हजार वेतन दिले जाते. प्रत्यक्षात त्यांच्या नावे सुमारे २५ हजाराचे वेतन कंपनीकडून घेतले जात आहेत. या कामगारांचे पासबुकही ठेकेदारांकडे जमा असल्याची तक्रार त्यांनी केली. या प्रकाराबाबत मंत्री सामंत यांनी नाराजी व्यक्त केली.
त्यानंतर तालुक्यातील कोंडफसवणे येथे थ्रीफेज विद्युत वाहिनी, खडपोली औद्योगिक वसाहतीतील रस्ता, कंपन्यांमधील सांडपाणी याबाबत. ग्रामस्थांनी तक्रारी केल्या. या विषयावरून मंत्री सामंत यांनी एमआयडीसी विभागाला तातडीने रस्त्याची व्यवस्था करण्याच्या तसेच दूषित सांडपाण्याविषयी प्रदूषण नियंत्रण मंडळाने कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.
आपण केलेल्या सूचनांवर पुढे काय कार्यवाही झाली, याची माहिती आठवडाभरातच आपण घेऊ, असेही त्यांनी यावेळी संगितले.