तुषार पाचलकर /राजापूर
राजापूर तालुक्यातील मौजे करक येथील अर्जुना मध्यम प्रकल्पातील अर्जुना धरण आज दि. १० जुलै २०२५ रोजी पहाटे ५.३० वाजता पूर्ण क्षमतेने भरले असून, सांडव्यावरून ३.५ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. धरणात सध्या २.६४ टीएमसी एवढा पाणीसाठा असून, २०२३ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.
धरण परिसराची पाहणी कार्यकारी अभियंता श्री. विवेक सोनार यांनी उपविभागीय अभियंता व क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत केली. धरण व त्याची इतर उपसंरचना सुस्थितीत असून परिसरात सीसीटीव्हीच्या निगराणीखाली नियंत्रण ठेवण्यात येत आहे.
सांडव्यावरून होणाऱ्या विसर्गामुळे अर्जुना नदीच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तसेच, अर्जुना धरण हे प्रतिबंधित क्षेत्र असल्याने पर्यटकांना प्रवेशास मनाई करण्यात आली आहे.
पार्श्वभूमी – मागील वर्षीच्या तुलनेत यंदा अधिक जलसाठा
या वर्षी १ जून २०२५ रोजी धरणात ४५% पाणीसाठा होता. गेल्या वर्षी म्हणजेच ७ जुलै २०२४ रोजी धरण भरले होते, त्यावेळी केवळ १३२० मिमी पर्जन्यमानाची नोंद झाली होती. त्याच वर्षी एक जूनला साठा ७५% होता. एकूण २०२४ मध्ये ५४५५ मिमी पावसाची नोंद झाली होती.