मंडणगड: शाळेच्या सुट्ट्यांमध्ये आपल्या मूळ गावी मंडणगड तालुक्यातील म्हाप्रळ येथे आलेल्या एका ४४ वर्षीय तरुणाचा पोटात इन्फेक्शन झाल्याने मुंबईतील सर जे.जे. रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. रंजित शांताराम डोंगरे (वय ४४, रा. म्हाप्रळ, अडखळवन, ता. मंडणगड, सध्या रा. नालासोपारा पूर्व, जि. पालघर) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रंजित डोंगरे हे त्यांच्या मुलीला शाळेला सुट्टी असल्याने मूळ गावी सोडण्यासाठी आले होते. १८ जून रोजी दुपारी २ वाजून ५० मिनिटांनी त्यांना अचानक पोटात तीव्र दुखू लागले.
त्यांना तातडीने म्हाप्रळ येथील एका खासगी दवाखान्यात उपचारासाठी नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी तपासणी करून पुढील उपचारांसाठी माणगाव येथे हलवण्याचा सल्ला दिला. त्यानुसार, त्यांना माणगाव येथे नेण्यात आले. माणगाव येथील डॉक्टरांनी त्यांच्या पोटाचा एक्स-रे काढून तपासणी केली असता, त्यांना पोटात गंभीर इन्फेक्शन झाल्याचे निष्पन्न झाले.
स्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन, माणगाव येथील डॉक्टरांनी रंजित डोंगरे यांना पुढील उपचारांसाठी मुंबईतील सर जे.जे. रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार, त्यांना मुंबईतील सर जे.जे. रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, दुर्दैवाने उपचारादरम्यान १८ जून रोजी त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेची माहिती रत्नागिरी पोलिसांना मिळाल्यानंतर, २१ जून २०२५ रोजी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
मुंबईहून गावी मंडणगडला आलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू
