संगमेश्वर: चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकरी बांधवांसाठी आमदार शेखर निकम यांनी एक महत्त्वपूर्ण आणि तातडीचे आवाहन केले आहे. नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे भात आणि नाचणी पिकाचे मोठे नुकसान झाले असून, या नुकसानीचे संयुक्त पंचनामे करण्याची कार्यवाही प्रशासनाकडून युद्धपातळीवर सुरू आहे.
या पार्श्वभूमीवर, नुकसानीची भरपाई मिळण्यास कोणताही विलंब होऊ नये यासाठी, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रे त्वरित आपल्या ग्रामपंचायत कार्यालयात जमा करण्याचे आवाहन आमदार निकम यांनी केले आहे.
शेतकऱ्यांनी खालीलप्रमाणे नमूद केलेली कागदपत्रे जमा करणे आवश्यक आहे:
१. ७/१२ आणि ८ अ चा उतारा
२. आधार कार्डची छायांकित प्रत (झेरॉक्स)
३. बँक पासबुकची छायांकित प्रत (झेरॉक्स)
४. शेतकरी आयडी क्रमांक (Farmer ID)
५. झालेल्या नुकसानीचे छायाचित्र (फोटो)
आमदार शेखर निकम यांनी स्पष्ट केले आहे की, लवकरात लवकर पंचनामे पूर्ण होऊन शेतकऱ्यांना शासनाची मदत मिळावी, यासाठी ही कागदपत्रे त्वरित जमा करणे अत्यावश्यक आहे.
या कागदपत्रांच्या पूर्ततेबाबत किंवा इतर कोणत्याही माहितीसाठी शेतकरी बांधवांनी आपल्या ग्राम महसूल अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी आणि ग्रामपंचायत अधिकारी यांच्याशी त्वरित संपर्क साधावा, असेही आवाहन आमदार निकम यांनी केले आहे. वेळेत कागदपत्रे जमा केल्यास नुकसान भरपाईची प्रक्रिया गतिमान होण्यास मदत होईल, असे त्यांनी नमूद केले.





