रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नसून, आज शुक्रवारी सकाळी उक्षी फाटा परिसरात एक थरारक घटना घडली. रस्त्यावर ऑईल सांडल्याने वेगात असलेल्या तीन दुचाकी एकापाठोपाठ एक घसरल्या. या अपघातात चार जण किरकोळ जखमी झाले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हे सर्व दुचाकीस्वार संगमेश्वरकडून रत्नागिरीच्या दिशेने प्रवास करत होते. सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास उक्षी फाट्याजवळ आल्यावर रस्त्यावर सांडलेल्या ऑईलमुळे चालकांचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि दुचाकी रस्त्यावर फरफटत गेल्या.
या घटनेनंतर परिसरात काही काळ खळबळ उडाली होती. रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या इतर वाहनधारकांनी तत्काळ थांबून जखमींना मदत केली. ऑईल नेमके कोणत्या वाहनातून सांडले, याबाबत अद्याप स्पष्टता झालेली नाही, मात्र अशा प्रकारे भररस्त्यात ऑईल सांडल्याने प्रवाशांच्या जिवावर बेतल्याने स्थानिक नागरिक आणि वाहनधारकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. महामार्गावर अशा प्रकारे ऑईल सांडलेले असताना प्रशासनाकडून किंवा संबंधित विभागाकडून ते तातडीने स्वच्छ का करण्यात आले नाही, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.





