GRAMIN SEARCH BANNER

आंतरराष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धेत चिपळूणच्या निशा आंबेकर यांची सुवर्णभरारी; थायलंडमध्ये पटकावली तीन सुवर्णपदके

चिपळूण: जागतिक स्तरावर आपल्या कौशल्याची मोहोर उमटवत चिपळूण सायकलिंग क्लबच्या सुप्रसिद्ध खेळाडू सौ. निशा आंबेकर यांनी आंतरराष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धेत तिहेरी सुवर्ण कामगिरी करून भारतासह चिपळूणचे नाव जगभरात उज्ज्वल केले आहे.

थायलंडमधील श्रीराचा येथे १७ ते २० एप्रिल २०२६ या कालावधीत आयोजित ‘वर्ल्ड मास्टर्स स्पोर्ट्स चॅम्पियनशिप’ अंतर्गत आंतरराष्ट्रीय ॲथलेटिक्स आणि स्विमिंग स्पर्धा पार पडल्या. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करताना सौ. आंबेकर यांनी आपल्या खेळाची ताकद दाखवून देत थाळीफेक, गोळाफेक आणि भालाफेक अशा तीनही प्रकारांत सुवर्णपदके पटकावून ऐतिहासिक यश संपादन केले.

त्यांच्या या देदीप्यमान यशाची दखल घेत चिपळूणच्या श्री ग्रामदैवत जुना कालभैरव देवस्थान ट्रस्टच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी देवस्थानच्या वतीने त्यांना सन्मानपूर्वक श्रींचा प्रसाद देऊन गौरविण्यात आले. या गौरव सोहळ्याप्रसंगी सौ. रमा शेट्ये, देवस्थानचे विश्वस्त समीर शेट्ये, पंकज कोळवणकर, सुमंता शिंदे, करसल्लागार गजानन आंबेकर यांसह इतर मान्यवर उपस्थित होते. एकाच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत तीन सुवर्णपदकांची कमाई करणाऱ्या सौ. निशा आंबेकर यांच्यावर सध्या सर्वस्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या या कामगिरीमुळे चिपळूणच्या क्रीडा वैभवात मोठी भर पडली आहे.

Total Visitor Counter

3485521
Share This Article