सोशल मीडियावर फलक व्हायरल
रत्नागिरी : राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अजब आणि ढिसाळ कारभाराचा एक नमुना सध्या रत्नागिरीत चांगलाच चर्चेचा आणि संतापाचा विषय ठरत आहे. रत्नागिरी परिसरातील सडामिऱ्या रस्त्यावर महामार्ग विभागाने दिशादर्शक फलक लावला आहे. या फलकावर सरळ गेल्यास ‘सडामिऱ्या’ असा उल्लेख आहे, तर डाव्या हाताला वळल्यास ‘तुंबाड’ नावाचे गाव असल्याचा बाण दाखवला आहे. मात्र, धक्कादायक आणि हास्यास्पद बाब अशी की, संपूर्ण रत्नागिरीच्या या भागात ‘तुंबाड’ नावाचे कोणतेही गाव अस्तित्वातच नाही!
महामार्ग विभागाच्या या अचाट ज्ञानामुळे स्थानिक नागरिक आणि वाहनचालक चक्रावून गेले आहेत. एखादा चित्रपट पाहून किंवा शासकीय वातानुकूलित कार्यालयात बसून अधिकाऱ्यांनी हा जावईशोध लावला आहे का, असा खोचक सवाल आता रत्नागिरीकर विचारत आहेत. स्थानिक भूगोलाची कोणतीही माहिती न घेता, केवळ कंत्राटदारांचे खिसे भरण्यासाठी आणि कागदोपत्री कामे दाखवण्यासाठी असले दिशाभूल करणारे फलक लावले जात असल्याचा संताप व्यक्त होत आहे.
बाहेरून येणाऱ्या पर्यटकांनी किंवा वाहनचालकांनी या फलकावर विश्वास ठेवून डावीकडे वळण घेतले, तर त्यांना केवळ आणि केवळ मनस्ताप सहन करावा लागणार आहे. सरकारी पैशांची अशा प्रकारे उधळपट्टी करताना अधिकाऱ्यांचे डोळे मिटले होते का, असा आक्रमक प्रश्न जनतेतून उपस्थित केला जात आहे. हा फलक लावण्यापूर्वी संबंधित अभियंत्यांनी जागेची पाहणी करण्याची तसदी का घेतली नाही? की रत्नागिरीत रात्रीतून नवीन गाव वसवण्याचा चमत्कार महामार्ग विभागाने केला आहे?
अशा गंभीर चुकांमुळे प्रशासकीय अनागोंदी चव्हाट्यावर आली आहे. महामार्ग विभागाने आपला हा गाढवपणा आणि अजब जावईशोध त्वरित मागे घ्यावा, अन्यथा या दिशाभूल करणाऱ्या फलकाविरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे. प्रशासनाने हा फलक त्वरित बदलून तिथे योग्य गावाचे नाव लिहावे, हीच आता अपेक्षा आहे.







