GRAMIN SEARCH BANNER

मृदुला पाटीलची महाराष्ट्र तायक्वांदो संघात निवड

Gramin Varta
137 Views

राष्ट्रीय स्पर्धेत रत्नागिरीचे प्रतिनिधित्व; ना. सामंतांकडून शुभेच्छा

रत्नागिरी: रत्नागिरीतील एस.आर.के. तायक्वांदो क्लबची खेळाडू मृदुला योगेश पाटील हिची तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडिया आयोजित राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. तिने चिपळूण येथे नुकत्याच पार पडलेल्या 35 व्या ज्युनिअर अजिंक्यपद राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत 17 वर्षांखालील 49 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकून हे स्थान निश्चित केले.

तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र आणि रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशनच्या सहकार्याने डेरवण, चिपळूण येथील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये दि. 23 ते 25 ऑक्टोबर दरम्यान या स्पर्धा पार पडल्या. मृदुला पाटील हिच्या या नेत्रदीपक यशामुळे तिची निवड 42 व्या राष्ट्रीय तायक्वांदो ज्युनियर क्युरुगी चॅम्पियनशिप २०२५ या स्पर्धेसाठी झाली आहे.

कर्नाटका तायक्वांदो असोसिएशन यांच्या सहकार्याने कोरमंगलम इनडोअर स्टेडियम, बेंगलोर (कर्नाटक) येथे दि. 31 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर या कालावधीत ही राष्ट्रीय स्पर्धा होणार आहे. यासाठी महाराष्ट्र संघ 29 ऑक्टोबर रोजी रवाना होणार आहे. मृदुला हिला राष्ट्रीय पंच व प्रशिक्षक शाहरुख शेख यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.

मृदुला पाटील हिच्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. मा. उदयजी सामंत साहेब, उद्योग आणि मराठी भाषा मंत्री, महाराष्ट्र शासन व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी विशेषतः शुभेच्छा दिल्या आहेत.

यासोबतच बिपिन बंदरकर, मुन्ना देसाई, दीपक पवार, प्रथमेश साळवी, तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. अविनाश बारगजे, महासचिव मिलिंद पठारे, कोषाध्यक्ष व्यंकटेश्वर कररा, सचिव सुभाष पाटील, शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्रवीण बोरसे, धुलीछंद मेश्राम, प्रशांत मकवाना, मिलिंद भागवत, अमोल सावंत, वीरेश मयेकर, शीतल खामकर, अंजली सावंत यांच्यासह अनेक पदाधिकारी व सदस्यांनी तिचे अभिनंदन करून राष्ट्रीय स्पर्धेतील पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. मृदुलाच्या निवडीमुळे रत्नागिरी जिल्ह्याचा गौरव वाढला आहे.

Total Visitor Counter

3199281
Share This Article