रत्नागिरी : रत्नागिरी एमआयडीसी, मिरजोळे परिसरातील साई हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या धीरेश्वर गिरिन ब्रम्हा (वय ५४, मूळ रा. कटजहार, ता. गोवर्धन, जि. बक्सा, आसाम) यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याची घटना ३ डिसेंबर २०२५ रोजी रात्री उशिरा घडली. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून ते ताप आणि थंडीने आजारी होते.
या घटनेची नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात ‘अमृ. क्र. ९७/२०२५’ प्रमाणे ‘बी.एन.एस.एस १९४’ अन्वये करण्यात आली आहे. धीरेश्वर ब्रम्हा हे सध्या मिरजोळे एमआयडीसी येथील प्लॉट क्र. बी-७/२ येथे वास्तव्यास होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धीरेश्वर ब्रम्हा यांना गेल्या काही दिवसांपासून ताप आणि थंडीचा त्रास होत होता. ३ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ६.३० च्या सुमारास त्यांना जास्त ताप आणि थंडी जाणवू लागल्याने त्यांनी कुवारबाव येथील मेडिकलमधून औषधे घेऊन खोलीवर आराम केला.
रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास त्यांचे सहकारी नैनश विलास लकेश्री यांनी त्यांना आवाज दिला असता, त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्यांना तातडीने उपचारासाठी साई हॉस्पिटल, एमआयडीसी, रत्नागिरी येथील डॉ. शिगवण यांच्याकडे दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर रात्री ११.३० वाजता धीरेश्वर ब्रम्हा यांना उपचारापूर्वीच मयत घोषित केले.
या घटनेची खबर पोलीस दफ्तरी दाखल करण्यात आली आहे.पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे.






