पोलादपूर: पोलादपूर तालुक्यातील पोलादपूर महाबळेश्वर मार्गावरील अश्विनी ऑटोमोबाईल पेट्रोल पंपाजवळ एका कारने अचानक पेट घेतला. ही घटना (दि.27) दुपारी 4 वाजून 15 मिनिटांनी घडली.
याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार कापडे बु. डोंबेश्वरवाडी येथे भागवत शेलार यांच्या गाडीने अचानक पेट घेतला. भर वस्तीत असलेल्या सीएनजी गाडीला लागलेल्या आगीवर तेथील अश्विनी ऑटोमोबाईल पेट्रोल पंपाच्या अग्निशमन यंत्र आणि ऋषिकेश जगदाळे यांच्यासह स्थानिक ग्रामस्थांनी आगी वर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न केले.
कार (एम एच 43 आर 9893) मध्ये शेलार रस्त्याच्या बाजूला कार उभी करून साहित्य गाडीत भरत असताना अचानक गाडीने इंजिनच्या बाजूने पेट घेतला. कारमधील सीएनजी गॅस कमी असल्याने तातडीने नियंत्रण मिळविण्यात यश आले. सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसून कार चे नुकसान झाले आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
पोलादपूर-महाबळेश्वर मार्गावर कारने घेतला अचानक पेट
