कर्तव्यावर रील बनवली; पनवेल एसटी आगारातील तिघांचे निलंबन

Gramin Varta
5 Views

पनवेल: राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पनवेल आगारातील कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांना रील बनवणे चांगलेच महागात पडले आहे. एसटीच्या गणवेशात आगारातील नियंत्रण कक्षात रील तयार करून ती सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी महिला वाहक नंदा कोळी यांच्यासह वाहतूक नियंत्रक अधिकारी विजय माने आणि सुनील देशमुख यांना निलंबित करण्यात आले आहे.

नंदा कोळी यांनी कर्तव्यावर असताना गणवेशात नियंत्रण कक्षात रील तयार केली होती. या व्हिडिओमध्ये वाहतूक नियंत्रक अधिकारी विजय माने आणि सुनील देशमुख हेही सहभागी झाले होते. यातील एका अधिकाऱ्याने महिला वाहकाला गुलाबाचे फूल देतानाचा प्रसंगही रीलमध्ये दिसत होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, फेसबुकवर त्याला ७ लाख ५१ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाल्याची माहिती आहे.

व्हिडिओची दखल घेत एसटी महामंडळाच्या मुंबई विभागाने त्याची पडताळणी केली. त्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. विभागीय चौकशीनंतर तिघांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडिया वापराबाबत नवीन आचारसंहिता जारी केली आहे. कर्तव्यावर किंवा गणवेशात असताना रील, व्हिडिओ अथवा लाईव्ह स्ट्रीमिंग करण्यास बंदी घालण्यात आली आहे. बस, आगार, बसस्थानक किंवा कार्यालयीन परिसरात परवानगीशिवाय व्हिडिओ तयार करण्यासही मनाई करण्यात आली आहे. महामंडळाची प्रतिमा, प्रवासी सुरक्षा आणि शिस्त अबाधित ठेवण्यासाठी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर यापुढेही कठोर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे.

Total Visitors :
4678938
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *