खेड:- खेड तालुक्यातील अनुसपुरे-मालपवडी येथे क्षयरोग (टीबी) या गंभीर आजाराला कंटाळून एका ३० वर्षीय विवाहित महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
ही दुर्दैवी घटना गुरुवार, ४ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास घडली.
जयश्री मनोहर मालप (वय ३०, रा. अनुसपुरे- मालपवडी) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. गेल्या काही काळापासून त्या क्षयरोगाने ग्रस्त होत्या. या आजाराला त्या खूप कंटाळल्या होत्या, असे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले आहे.
घरातील लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, जयश्री यांनी राहत्या घरात माळ्यावर असलेल्या लोखंडी चॅनेलला नायलॉनच्या साडीच्या सहाय्याने गळफास लावून घेतला. ही बाब लक्षात येताच, त्यांना तातडीने खाली उतरवण्यात आले. मात्र, त्यांचा जीव वाचू शकला नाही. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही आत्महत्या क्षयरोगामुळे आलेल्या नैराश्यातून झाल्याचे दिसून येत आहे. या घटनेचा पुढील तपास खेड पोलीस करत आहेत.
खेडमध्ये आजाराला कंटाळून ३० वर्षीय महिलेची आत्महत्या
