पुणे: पुणे येथील अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्टच्या वतीने आयोजित म्हसोबा उत्सवात राजापूरकर ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर यांना ‘कलाभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
‘धार्मिकतेतून विधायकतेकडे वाटचाल’ हे ब्रीद घेऊन कार्य करणाऱ्या शुक्रवार पेठ, पुणे येथील अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्टने नुकतेच यंदाच्या म्हसोबा उत्सवाचे आयोजन केले होते. या वेळी विविध क्षेत्रांतील मान्यवरांना ‘भूषण’ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. यामध्ये, चितळे बंधूचे संचालक संजय चितळे यांना ‘व्यापार भूषण’, आर. डी. डेव्हलपर्सचे संचालक निलेश भिंताडे यांना ‘उद्योगभूषण’, ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर यांना ‘कलाभूषण’, प्रख्यात गायक श्रीनिवास भीमसेन जोशी यांना ‘संगीत भूषण’, श्रीज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदीचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ यांना ‘धार्मिक भूषण’ आणि पत्रकार व संपादक आनंद अग्रवाल यांना ‘पत्रकारिता भूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
याव्यतिरिक्त, सद्गुरू बाळूमामा देवालय आदमापूरच्या कार्याध्यक्ष रागिणी खडके यांचाही यावेळी विशेष सन्मान करण्यात आला. सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, फळांची करंडी, महावस्त्र आणि श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
मुंबईतील बुरूड आळी येथे हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रांतील मान्यवर, अधिकारी वर्ग आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.