खेड : कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या दिवा–सावंतवाडी एक्स्प्रेसला अखेर खेड तालुक्यातील आंजणी तसेच रायगड जिल्ह्यातील कोलाड रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर झाला आहे. रेल्वे प्रशासनाने हा निर्णय शुक्रवारी सायंकाळी अधिकृतरीत्या जाहीर केला असून, २८ जुलैपासून ही एक्स्प्रेस दोन्ही स्थानकांवर थांबणार आहे.
या एक्स्प्रेसला यापूर्वी आंजणी आणि कोलाड येथे थांबा नसल्याने दोन्ही भागांतील प्रवाशांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत होता. विशेषतः रोजच्या कामानिमित्त प्रवास करणाऱ्या शासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह विद्यार्थ्यांनाही याचा मोठा फटका बसत होता. या पार्श्वभूमीवर अखंड कोकण प्रवासी सेवा समिती आणि कोकण विकास समिती यांच्या वतीने रेल्वे बोर्डाकडे वारंवार निवेदने सादर करून पाठपुरावा करण्यात आला होता.
या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश मिळत अखेर रेल्वे प्रशासनाने दोन्ही स्थानकांवरील थांब्यास मंजुरी दिली आहे. गणेशोत्सवाच्या तोंडावर झालेला हा निर्णय दोन्ही तालुक्यातील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी ठरली आहे. स्थानिक जनतेच्या मागण्यांना प्रतिसाद देत रेल्वे प्रशासनाने घेतलेला हा निर्णय स्वागतार्ह आहे, अशी प्रतिक्रिया प्रवासी वर्गातून व्यक्त केली जात आहे.
आता कोलाड व आंजणी येथील नागरिकांना थेट सावंतवाडी किंवा दिवाकडे सहज प्रवास करता येणार असून, यामुळे दोन्ही जिल्ह्यांतील दळणवळण व्यवस्था अधिक सुलभ होणार आहे.
दिवा-सावंतवाडी एक्स्प्रेसला अंजनी आणि कोलाड येथे थांबा मंजूर; प्रवाशांना मोठा दिलासा
