GRAMIN SEARCH BANNER

पतीच्या प्रेमसंबंधाच्या संशयातून पत्नीची आत्महत्या

चिपळूणमध्ये सुनेच्या आत्महत्येप्रकरणी सासू सासऱ्यावर गुन्हा

चिपळूण : प्रेमसंबंधाच्या संशयातून होणाऱ्या सततच्या शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून एका विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना चिपळूण तालुक्यातील खांदाट, मोरवणे फाटा येथील राहत्या घरी घडली आहे. या प्रकरणी विवाहितेच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, पती आणि सासूविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विनायक जयसिंग राठोड (वय ५५, रा. जानवळ, ता. चाकूर, जि. लातूर) यांनी गुरुवारी (२६/०६/२०२५) दुपारी १२.०६ वाजता चिपळूण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, त्यांची मुलगी शकुंतला अशोक चव्हाण हिने पती अशोक मोतीराम चव्हाण आणि सासू कमलाबाई मोतीराम चव्हाण (दोघे रा. मोरवणे, खांदाटपाली, ता. चिपळूण) यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचे म्हटले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सन २०१७ पासून ते २५ जून २०२५ रोजी दुपारी १२.३० वाजेच्या दरम्यान हा प्रकार घडला. फिर्यादी विनायक राठोड यांच्या म्हणण्यानुसार, त्यांची मुलगी शकुंतला हिचा पती अशोक चव्हाण याच्या कामावर काम करणाऱ्या सुप्रिया नावाच्या मुलीशी प्रेमसंबंध असल्याचा संशय होता. याच कारणावरून अशोक चव्हाण हा शकुंतलासोबत वारंवार वाद घालत होता. या वादातून तो तिला हाताने मारहाण करत असे, तसेच लाथाबुक्क्यांनीही मारहाण करत होता.

याव्यतिरिक्त, आरोपी सासू कमलाबाई मोतीराम चव्हाण ही देखील शकुंतला हिला सतत शिवीगाळ करत असे आणि “माझ्या घरातून निघून जा, मला तुझी गरज नाही,” असे बोलून दमदाटी करत असे. या सततच्या शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून शकुंतला अशोक चव्हाण हिने राहत्या घरात साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली, असे फिर्यादीत नमूद केले आहे.

चिपळूण पोलिसांनी या प्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त करणे, मारहाण आणि ३ (५) (कौटुंबिक हिंसाचार) या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास चिपळूण पोलीस करत आहेत.

Total Visitor Counter

2475126
Share This Article