GRAMIN SEARCH BANNER

ब्रेकिंग: लांजातील तोतया पोलिसाचा हैदोस; लग्नाचे आमिष दाखवून महिलांवर बलात्कार, आर्थिक फसवणूक

Gramin Varta
794 Views

सोलापूर पोलिसांनी केली मुंबईतून अटक

रत्नागिरी, मुंबई, सोलापुरात गुन्हे, 100 हून अधिक बेरोजगार तरुणांची फसवणूक

रत्नागिरी : पोलिस असल्याचे भासवून महिलांशी ओळख वाढवणे, त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढणे, खोटी नाटी कारणे सांगून पैसे उकळणे, विवाहित महिलाना लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार करणे असा हैदोस घालणारा लांजा येथील तोतया पोलिसाला सोलापूर पोलिसांनी 12 ऑक्टोबर रोजी अटक केली आहे. वैभव दीपक नारकर (वय ३१, मूळ रा. गोविळ, ता. लांजा, जि. रत्नागिरी, सध्या रा. नायगाव, मुंबई) असे या ठगाचे नाव आहे.

त्याच्यावर रत्नागिरी, मुंबई, सोलापुरात गुन्हे दाखल आहेत. एवढच नव्हे तर त्याने बेरोजगार तरुणांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. त्याचे ६ वर्षापूर्वी लग्न झाले असुन ५ वर्षाचा एक मुलगा आहे. रत्नागिरीत त्याने 17 लाख 20 हजारांची फसवणूक केली आहे. त्याचे कारनामे आता पुढे येत आहेत.

सोलापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,विवाह जुळवणाऱ्या एका लोकप्रिय ॲपवर (Jeevansathi App) स्वतःची खोटी ओळख आणि बनावट बायोडेटा तयार करून अविवाहित मुलींना लग्नाचे आमिष दाखवून त्यांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या नारकरला सोलापूर शहर सायबर पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. सोलापूर शहर सायबर पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यातील फिर्यादी मुलीला आरोपी वैभव दीपक नारकर (वय ३१, मूळ रा. गोविळ, ता. लांजा, जि. रत्नागिरी, सध्या रा. नायगाव, मुंबई) याने ‘जीवनसाथी’ ॲपवर आपली खरी माहिती आणि ओळख लपवून लग्नाची रिक्वेस्ट पाठवली होती. त्याने फिर्यादीला आपण ‘पीएसआय’ (पोलीस उपनिरीक्षक) असल्याचे आणि अविवाहित असल्याचे सांगितले. एवढेच नव्हे, तर त्याने स्वतःचा बनावट बायोडाटा, पत्ता आणि पोलीस उपनिरीक्षकाचा गणवेश परिधान केलेले फोटो पाठवून फिर्यादीचा आणि त्यांच्या कुटुंबाचा विश्वास संपादन केला.

या विश्वासानंतर, आरोपीने मुंबई येथे पोलीस खात्यात अधिकारी पदावर नोकरीस असल्याचे भासवून फिर्यादीकडून वेगवेगळ्या कारणांसाठी ऑनलाईन पद्धतीने पैसे मागण्यास सुरुवात केली. मावस भावाचा अपघात, त्याच्या उपचारांसाठी लागणारा खर्च, तसेच मावस भाऊ आणि मावशी यांच्या अंत्यविधीसाठी पैसे लागणार असल्याचे सांगून, आरोपीने १९/०७/२०२५ ते ०८/०८/२०२५ या कालावधीत एकूण ६३,०००/- रुपये ऑनलाईन पद्धतीने वेळोवेळी घेऊन फिर्यादीची आर्थिक फसवणूक केली.

या फसवणुकीप्रकरणी सोलापूर शहर सायबर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर क्रमांक ११/२०२५ नुसार भारतीय न्याय संहिता आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हा दाखल होताच, सायबर एक्स्पर्ट टीमने तांत्रिक विश्लेषण आणि इतर पुराव्यांच्या आधारे तपास पथक तात्काळ मुंबईला रवाना केले. अत्यंत शिताफीने पोलिसांनी आरोपी वैभव दीपक नारकर याचा मुंबईतील नायगाव परिसरातुन शोध घेऊन त्याला अटक केली.

पोलीस कोठडीदरम्यान करण्यात आलेल्या चौकशीत आरोपीने धक्कादायक कबुली दिली आहे. सोलापूरच्या फिर्यादीप्रमाणेच त्याने महाराष्ट्रातील मुंबईसह इतर जिल्ह्यांमधील सुमारे ७ ते ८ अविवाहित मुलींना ‘जीवनसाथी’ ॲपवर आपण पीएसआय असल्याचे खोटे सांगून त्यांच्याशी विवाह करण्याचे बोलणी केले होते आणि वेगवेगळ्या कारणांनी त्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक केली असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

एवढेच नव्हे, तर आरोपीने रत्नागिरी आणि मुंबई परिसरातील १०० मुलांना देखील आपण पीएसआय असल्याचे सांगून, मंत्रालयातील आणि पोलीस खात्यातील अनेक अधिकारी आपल्या चांगल्या परिचयाचे आहेत, असे भासवले. या मुलांना पोलीस खात्यात आणि मंत्रालयात शासकीय नोकरी लावण्याचे आमिष दाखवून त्यांचीही मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक केल्याचे तपासात उघड झाले आहे.

पोलीस आयुक्त सोलापूर शहर श्री. एम. राजकुमार, पोलीस उप-आयुक्त श्रीमती. डॉ. अश्विनी पाटील मॅडम, सहा. पोलीस आयुक्त राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरिक्षक श्रीशैल गजा, पोलीस उप-निरिक्षक नागेश इंगळे, कृष्णात जाधव, निलेश गंगावणे,नितीन आसवरे आणि मच्छिंद्र राठोड यांनी ही महत्वपूर्ण कामगिरी यशस्वीरित्या पार पाडली. सायबर गुन्हेगार कितीही हुशार असले तरी त्यांचा छडा लावण्यासाठी सोलापूर पोलीस सज्ज असल्याची या कारवाईतून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

Total Visitor Counter

2665500
Share This Article