GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरीत दीड महिन्यांनंतर शाळांमध्ये किलबिलाट

Gramin Search
5 Views

रत्नागिरी: सुमारे दीड महिन्याच्या उन्हाळी सुट्टीनंतर सोमवारी  (१६ जून) नवे शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यामुळे शाळा पुन्हा मुलांच्या किलबिलाटाने गजबजल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात विविध शाळांमध्ये प्रवेशोत्सव साजरा करून विद्यार्थ्यांचे शाळेत स्वागत करण्यात आले.

जिल्ह्यात १० हजार १२१ विद्यार्थ्यांनी पहिलीला प्रवेश घेतला आहे. रत्नागिरी तालुक्यातल्या खेडशी-गयाळवाडी येथील स्वामी स्वरूपानंद वसाहतीतील जिल्हा परिषद शाळेत प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. पहिलीला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींचे शाळेतील पहिले पाऊल जतन करण्याच्या उद्देशाने त्यांच्या पावलाचे ठसे कागदावर उमटवण्यात आले. विद्यार्थ्यांचे औक्षण करून, फूल, फुगा आणि खाऊ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आलं. त्यानंतर काही जणांना प्रातिनिधिक स्वरूपात पाठ्यपुस्तके आणि गणवेशांचे वाटप करण्यात आले. या वेळी मुख्याध्यापिका मीना आखाडे, सहशिक्षिका रश्मी किंजळे, ग्रामपंचायत सदस्य श्री. पवार, विषयतज्ज्ञ वंदना गुरव, ज्येष्ठ पत्रकार आणि ग्रामस्थ प्रमोद कोनकर, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. बांद्रे आदींसह शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य आणि पालक उपस्थित होते.

विषयतज्ज्ञ गुरव यांनी शिक्षणाबद्दलची शासनाची भूमिका सांगितली आणि आताच्या पिढीच्या उपजतच हुशार असलेल्या मुलांना बौद्धिक खाद्य मिळावे, या दृष्टीने शासनाचे प्रयत्न असल्याचे त्यांनी नमूद केले. ‘जिल्हा परिषदेच्या शाळेत शैक्षणिक सुविधा मोफत मिळतात. त्या जपून वापरण्याचे संस्कार पालकांनीही विद्यार्थ्यांवर केले पाहिजेत. या शाळांचे वैशिष्ट्य म्हणजे शिक्षक प्रशिक्षित असतात. मुलांना स्थानिक भाषेतून शिक्षण मिळते. स्पर्धेच्या युगासाठी मुलांना तयार करण्यासाठी स्पर्धा परीक्षाही घेतल्या जातात. आता पहिलीपासून सीबीएसई पॅटर्न आला आहे. विद्यार्थी घरी गेल्यानंतर पालकांनीही त्यांच्याशी दररोज अभ्यासाविषयी संवाद साधावा,. त्यातून उजळणी होईल,’ असे गुरव यांनी सांगितले. मुख्याध्यापिका मीना आखाडे यांनी सर्वांचे स्वागत केले आणि आभार मानले.

शाळेच्या पहिल्या दिवशी शासनाच्या ‘१०० शाळांना भेटी देणे’ या उपक्रमाच्या अनुषंगाने रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नाचणे नंबर एक या शाळेला भेट देऊन पहिलीमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत केले. विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला आणि शाळेतील सुविधांबाबत आढावा घेतला. या वेळी नाचणे ग्रामपंचायतीचे सरपंच हृषीकेश भोंगले, विभागीय वनाधिकारी रणजित गायकवाड, शिक्षण विस्तार अधिकारी संदेश कडव, उपसरपंच निलेखा नाईक, कार्यक्रमाधिकारी रवींद्र कांबळे यांच्यासह शिक्षक उपस्थित होते. या वेळी जिल्हाधिकाऱ्यांनी शाळेच्या परिसरात वृक्षारोपण केले. विद्यार्थ्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते पाठ्यपुस्तके, गणवेश, बूट वितरित करण्यात आले. नवागतांचे स्वागत गुलाबपुष्प आणि रोप देऊन करण्यात आले. मुलांची घोडागाडीतून ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. नवीन दाखल झालेल्या मुलांच्या पायाचे ठसे कागदावर उमटवून कागद पालकांच्या हाती सुपूर्द करण्यात आला. पदवीधर शिक्षक दीपक नागवेकर यांनी सूत्रसंचालन केले.

जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी झरेवाडी (ता. जि. रत्नागिरी) येथील जिल्हा परिषद शाळेत आणि रत्नागिरी नगर परिषदेच्या दामले विद्यालयात भेट देऊन शाळा प्रवेशोत्सवात सहभाग घेतला.

Total Visitor Counter

2650726
Share This Article