पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून बांधकाम विभागाला सूचना
रत्नागिरी : रत्नागिरीच्या ऐतिहासिक रत्नदुर्ग किल्ल्यावर आता पर्यटकांना आणि विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना चढ-उताराचा त्रास होणार नाही. पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रयत्नांमुळे किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ 70 फूट उंचीची लिफ्ट उभारली जाणार आहे. तशा सूचना सामंत यांनी बांधकाम विभागाला दिल्या आहेत. यामुळे किल्ल्याचे सौंदर्य जपून पर्यटकांना किल्ल्यावर सहजपणे पोहोचता येणार आहे.
रत्नदुर्ग किल्ल्यावर अलीकडेच शिवसृष्टी उभारण्यात आली आहे. ज्यामुळे किल्ल्याला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या लक्षणीय वाढली आहे. तसेच, किल्ल्यावरील देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्याही वाढली आहे. मात्र, किल्ल्यावर जाण्यासाठी असलेल्या पायऱ्या चढताना अनेक ज्येष्ठ नागरिक आणि शारीरिकदृष्ट्या दुर्बल लोकांना त्रास होत होता.
या समस्येची दखल घेत अनेक वयोवृद्ध नागरिकांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे लिफ्ट बसवण्याची मागणी केली होती. त्यानुसार पालकमंत्री सामंत यांनी या प्रकल्पात जातीने लक्ष घातले असून, त्यासाठी लाखो रुपयांचा निधीही उपलब्ध करून दिला आहे.
ही लिफ्ट सुरू झाल्यावर रत्नागिरीच्या पर्यटनाला चालना मिळेल, अशी आशा व्यक्त होत आहे.