चिपळूण : चिपळूण तालुक्यातील खडपोली येथील महेक अडरेकर हिने वैद्यकीय शिक्षणामध्ये मोठे यश मिळवले आहे. तिने राजीव गांधी युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस, कर्नाटक येथून “बॅचलर ऑफ फिजिओथेरपी (BPT)” ही पदवी प्रथम श्रेणीत संपादन केली आहे. या यशाबद्दल तिला आता ‘डॉ.’ हा बहुमानाचा उपसर्ग लावता येणार आहे.
महेक ही खडपोलीच्या माजी सरपंच मुस्कान अडरेकर आणि मुस्लिम समाज विकास संघ, जिल्हा रत्नागिरीचे अध्यक्ष तसेच चिपळूण राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मुराद अडरेकर यांची कन्या आहे. तिच्या या यशामागे तिची सातत्यपूर्ण मेहनत, आत्मविश्वास, ध्येयनिष्ठा, तसेच पालकांचा भक्कम पाठिंबा आणि शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन यांचा मोलाचा वाटा आहे. तिने आपले संपूर्ण शिक्षण प्रथम श्रेणीत पूर्ण केले आहे.
डॉ. महेक अडरेकर हिचे हे यश तिच्या कुटुंबासाठी तर अभिमानास्पद आहेच, पण त्याचबरोबर संपूर्ण चिपळूण तालुका आणि मुस्लिम समाजासाठीही गौरवास्पद व प्रेरणादायी ठरले आहे. वैद्यकीय क्षेत्रात पदार्पण करतानाच ती आपले ज्ञान समाजहितासाठी वापरण्याचा मानस बाळगते, हे विशेष कौतुकास्पद आहे.